जांभवडेच्या बबलीने धरला डीजेवर ठेका : जिल्ह्यात महेशच्या डान्सची मोठी क्रेझ
सोशल मिडीयावर होतोय व्हायरल
संपादक | मयुर ठाकूर : तळकोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमगोत्सव सुरू झाला की, गोमुच्या नाचांना मोठी रंगत येते. मात्र नव्या जमान्यात आता गोमूचा नाचही मॉर्डन झालाय. पारंपरिक गीतांना फाटा देत आता गोमू आपल्या सोबत मिनी डीजे घेत शिमगोत्सवाची रंगत वाढवत आहेत. यात सध्या टॉपला आहे ती जांभवडे गावची बबली… म्हणजे महेश मडव (वय ३८ रा. जांभवडे, टेमवाडी, ता. कुडाळ). महेश सध्या सर्वच बाजारपेठेत ‘बबली’ म्हणून प्रचलीत आहे.या बबलीची थक्क करणारी दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. सध्या ही बबली जिल्ह्याच्या विविध बाजारपेठांत डीजेच्या ठेक्यावर धुमाकूळ घालत आहे.
अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हा कलाकार. जांभवडे गावचा सुपुत्र आहे. महेश मडव नोकरीकरिता मुंबई येथे स्थायिक झाले. महेश हे अतिशय देखण्या रूपाचे असून त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड. टीव्ही समोर उभे राहून त्यांनी नृत्यात प्राविण्य मिळवले. त्यानंतर नृत्य ही त्यांची पॅशनच बनली. मुंबई येथे ते बदलापूर येथे राहायचे व फार्मासिटिकल कंपनी ते नोकरीला होते. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे महेशच्या नोकरीवर काहीसा परिणाम झाला. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. आलेल्या संकटावर मात करण्यासाठी महेशने नृत्याचा आधार घेतला. आणि नृत्य क्लासबरोबरच स्टेज ‘शो’ देखील सुरू केले. म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने महेशने आपल्या देखणेपणाचा आधार घेतला. तो आहे..? की ती..? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. याला कारणही तेवढेच होते. देखण्या स्त्रीच्या रूपात नृत्याचे शो करण्यास महेशने सुरुवात केली. महेशचे शो एवढे गाजले की मुंबई नव्हे तर, देश – विदेशातून त्यांच्या स्टेज शोला मागणी येऊ लागली. कालांतराने महेश एक स्टेज आर्टिस्ट बनला.टोपण नावही ‘बबली’च पडलं होतं. आणि त्याचं कॅरेक्टर ‘बबली’ हे प्रचंड गाजलं.
शिमगोत्सवामुळे तरुणाईच्या कोकणात उत्साहाला मोठे उधाण आले आहे. महेश हे सध्या घरोघरी जाऊन गोमूचे नृत्य सादर करत आहेत. त्यातच अलीकडेच फेमस झालेली ‘आई तुझ देऊळ’, “तुझ्यासाठी आले वनात’, ‘एक दोन तीन’ अशा अनेक मराठी हिंदी गाण्यांवर – कणकवली तालुक्यातील कनेडी, नाटळ, भिरवंडे, दारिस्ते आणि कणकवली शहर या भागामध्ये जात शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महेश सध्या नृत्य सादर करत आहेत. या नृत्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक रसिकप्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. महेश सध्या मुंबई येथे चित्रपट सृष्टीमध्ये सहकलाकाराची भूमिका बजावत आहेत. अलीकडे दोन तीन वर्षे ते शिमगोत्सवात – आर्वजून गावाकडे येऊन अदाकारी सादर करीत आहेत. त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळू लागले आहे. त्यांनी परिधान केलेली वेशभूषा ही आताच्या तरुणाईला लाजवेल अशी आहे. ढोलकी, डफ आणि तुणतुणे घेऊन मांडावर तमाशा सादर केला जातो. घरोघरी जाऊन गोमूचे नृत्य साजरे करून ‘शबय’ मागितली जाते. यावेळी खरोखरच मनापासून आणि कोणतीही लाज न बाळगता आवडीने साडी परिधान करून विविध लोकगीते, कोळीगीते आणि मराठी – हिंदी गाणी म्हणून लोकांचे मनोरंजन केले जाते. याला बबली अपवाद ठरलाय. महेश यांनी कनेडी परिसरात पहिले नृत्य सादर करून लोकांचे मनोरंजन केले. त्यानंतर हळूहळू महेश यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि सर्वांच्या व्हाट्सअपचा स्टेटस बनला. सोशल मीडियावर महेश यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. बुधवारी महेश यांनी कणकवली शहरात देखील वेगवेगळ्या ठिकाणी जात नृत्य सादर केले आणि कणकवलीवासियांची मनं जिंकली. आता या बबलीला विविध मांडावर कला सादरीकरणासाठी सुपारी मिळू लागलीय…