देवगड : देवगड तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे १ लाख ११ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात एकूण ४२ मीमी पाऊस पडला असून सकाळपासून तालुक्यातील काही भागात पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारे १ लाख ११ हजार ७०० इतके नुकसान झाले आहे.यामध्ये मिठबाव नरेवाडी येथील शिवदास सत्यवान नरे यांच्या घर व गोठ्यावर फणसाचे झाड पडून सुमारे ७४ हजार २०० रुपये, बुरंबावडे येथील प्राजक्ता प्रकाश शिंदे यांच्या घरावर रिठाचे झाड पडून १८ हजार, चिंचवड येथील सखाराम तातू चौगुले यांच्या घरावर झाड पडून १३ हजार, कुवळे येथील अंकुश तेली यांच्या मांगरावर माडाचे झाड पडून सुमारे ४ हजार, गोवाळ येथील विष्णू बाबाची घाडी यांच्या घराच्या शेड वरील पत्रे उडून गेल्याने २ हजार ५०० रुपये असे एकूण तालुक्यात १ लाख ११ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद देवगड तहसील येथे करण्यात आली आहे.आज सकाळपासूनच पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे.