लखनऊ : एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात आर्मीमध्ये जवान असलेल्या एका जावयाने सासू आणि मेहुण्यासोबत मिळून सासऱ्याच्या हत्येचा कट रचला. तरुणांनी जाऊन शेतात झोपलेल्या या व्यक्तीची निघृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी ३ लोकांना अटक केली आहे. यात मृत व्यक्तीची दोन मुलं आणि जावयाचा भाऊ यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणी आरोपी जावई आणि मृत व्यक्तीच्या पत्नीचा शोध घेत आहेत. घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील काकोड पोलीस स्टेशन परिसरात हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी ३ तरुणांना अटक केली आहे. ११ जुलैच्या रात्री गावात शेतात झोपलेल्या ५० वर्षीय गजेंद्र सिंहची निघृण हत्या करण्यात आली होती. रविवारी पोलिसांनी ५० वर्षीय गजेंद्र सिंह यांच्या हत्येबाबत खळबळजनक खुलासा केला. पत्नी, मुलगा आणि जावयाने मिळून गजेंद्र सिंहचा खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं. गजेंद्र सिंहचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यानंतर गजेंद्र सिंह तिच्याशी लग्न करून मालमत्ता तिच्या नावावर करण्याची धमकी देत असे. या भीतीने गजेंद्र सिंह यांच्या पत्नीसह त्यांच्या दोन मुलांनी आणि जावयाने त्यांच्या हत्येचा कट रचला. असं सांगण्यात येत आहे की सैन्यात असलेल्या जावयाने त्याचा भाऊ आणि अन्य आरोपींना पाठवलं आणि गजेंद्र सिंह यांची हत्या करायला सांगितलं. या हत्येत मृताच्या एका मुलाचाही सहभाग आहे. लष्करातील जवान असलेला जावई मुंबईत बसून क्षणोक्षणी अपडेट्स घेत होता, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी मृताची दोन मुलं संजू आणि अरुण आणि जावयाचा भाऊ कपिल याला अटक केली आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या तिन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या लालसेपोटी पत्नी, मुलगा आणि जावयाने मिळून हत्येचा कट रचला. या प्रकरणाची माहिती देताना बुलंदशहरचे एसपी सिटी शंकर प्रसाद
म्हणाले की, गजेंद्र सिंह हत्या प्रकरण ११ जुलैच्या रात्री काकोड पोलीस स्टेशन परिसरात घडले होते. आज पोलिसांनी गजेंद्र सिंह हत्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. या हत्येमागे मालमत्ता हाच मुख्य हेतू होता. सध्या मृताची दोन मुलं आणि जावयाच्या भावाला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.