8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

देशामध्ये प्रथम क्रमांकाची जिल्हा बँक बनविण्यासाठी आम्ही कटीबद्ध – मनिष दळवी

ओरोस : जिल्हा बँकेने गेल्या चार दशकात आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत असतांना आज अखेर बँकेने रु. ५७६७ कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. चालू आर्थिक वर्षात रु. ५५२.८० कोटी एवढी व्यवसायात वाढ झालेली असून बँकेचा रु. ६००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे. बँकेने ‘आपली शेतकऱ्यांची बँक’ या ओळखीबरोबरच आता ‘डिजिटल जिल्हा बँक’ अशी आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे मोठे उद्योग, व्यवसाय नसतानाही बँकेने सर्वांगीण प्रगती केलेली आहे.

जिल्हावासिंयानी जिल्हा बँक म्हणून जो आमच्यावर विश्वास टाकला तो विश्वास कायम ठेवावा, सहकार्य कायम ठेवावे. ही जिल्हा बँक गुणात्मक दृष्टीने व व्यवसाय वाढीच्या दृष्टीने या देशामध्ये प्रथम क्रमांकाची जिल्हा बँक बनविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मान. श्री. मनिष दळवी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिंधुदुर्गनगरी येथे शरद कृषी भवन येथे ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली झाली. सभेनंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, संचालक सर्वश्री व्हिक्टर डांन्टस, गजानन गावडे, संदिप परब, विद्याप्रसाद बांदेकर, महेश सारंग, विद्याधर परब, गणपत देसाई, विठ्ठल देसाई, ॲड. प्रकाश बोडस, दिलीप रावराणे, रवींद्र मडगावकर, समीर सावंत, सुशांत नाईक, मेघनाद धुरी, प्रकाश मोर्ये, श्रीम. नीता राणे, श्रीम. प्रज्ञा ढवण आदी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभेला मोठ्या संख्येने सभासदांची उपस्थिती होती.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये बँकेला रु. ३६९.८७ कोटींच्या नवीन ठेवी प्राप्त होऊन बँकेच्या एकूण रु. २९७२.७९ कोटी एवढ्या झालेल्या असून ठेवींच्या वाढीचे प्रमाण १४.२१% एवढे आहे. बँकेच्या कर्ज व्यवहारांमध्ये रु. १८२.९३ कोटीची वाढ होऊन एकूण कर्ज रुपये २४१८.१० कोटी एवढी झालेली आहे. बँकेच्या एकूण निधीमध्ये रु. ७८.५० कोटींची वाढ झालेली आहे व एकूण निधी रु. ४३४.४२ कोटी एवढा झालेला आहे. तसेच बँकेचा ढोबळ नफा रु. १००.५९ कोटी एवढा झालेला असून आवश्यक सर्व तरतुदीनंतर बँकेचा निव्वळ नफा रु. २६ कोटी एवढा झालेला आहे. चालू वर्षी बँकेच्या ढोबळ एन.पी.ए. प्रमाणामध्ये ०.०४ टक्के एवढी घट झाली असून बँकेच्या ढोबळ एन.पी.ए.चे प्रमाण ३.५२% तर निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण शुन्य टक्के आहे. बँकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (CRAR) ११.०५% एवढे असून विविध आर्थिक निकषांची पूर्तता नियमित करून याही वर्षी बँकेस वैधानिक लेखापरीक्षणामध्ये ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. बँकेच्या या प्रगतीमध्ये माझे सर्व सहकारी संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सहभाग आहे असे जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी स्पष्ट केले.
मान. खासदार श्री. नारायणरावजी राणेसाहेब तसेच आमदार मान. नितेश राणेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजनांद्वारे उत्तमोत्तम बँकिंग सेवा देत आहोत. डिजिटल बँकिंग बरोबर शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी शेळीपालन, पोल्ट्री फार्म, पशुधन, वराह पालन, बायोगॅस, गोठा बांधणी, पडीक जमिनीवर लागवड होऊन ओलिताखाली क्षेत्र आणण्यासाठी स्वतंत्र कर्ज योजना, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बळीराजा शैक्षणिक कर्ज योजना अशा प्रकारच्या विविध विविध योजनांच्या माध्यमातून इथला शेतकरी उभा राहावा यासाठी बँक प्रयत्न करीत आहे. याचबरोबरच शेतकरी फळबागायतदार, मत्स्य उद्योग, व्यावसायिक, नोकरदार यांनाही बँकेने नेहमी सहाय्य केले आहे.

विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी विकास संस्थाचे सचिव, चेअरमन, संचालक मंडळ यांच्यासाठी बँकेकडून विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यातील विकास संस्थांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न असून केंद्र शासनाच्या सहयोगातून जिल्ह्यातील विकास संस्थांचे १०० % संगणकीकरण करण्याचे काम गतिमान करण्यात आले आहे. विकास संस्थांच्या माध्यमातून गावागावात बँकिंग सुविधा शेतकरी वर्गाला मिळाव्यात यासाठी संस्थांना मायक्रो एटीएम् सुविधा सुरू करण्यात आली आहे. संस्थांच्या कर्ज वसुलीला प्रोत्साहन देण्यासाठी बँक व संस्था पातळीवर १०० % कर्ज वसुली केलेल्या संस्थांचा सत्कार करत त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बँकेने सातत्याने प्रयत्न करीत आहे. तसेच केडरच्या माध्यमातून जिल्ह्यात ५० नवीन सचिव विकास सस्थांना देण्यात येणार आहे.

दुग्ध क्रांतीचा ध्यास घेत गोकुळच्या माध्यमातून दूध संकलन तसेच दुग्ध संस्थांना जलद गतीने व सुलभतेने कर्ज पुरवठा करत जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीवर भर देण्यात आला असून पुढील काही वर्षात दुध उत्पादन १ लाख लिटर इतके करण्याचे ध्येय बँकेने ठेवले आहे. आज गावपातळीवर स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून महिलांचे संघटन उभे राहत आहे. बँक महिलांमध्ये आर्थिक, सामाजिक, परिवर्तन घडवून आणणे व त्याना मायक्रो फायनान्स द्वारे सक्षम करण्याकरीता ‘बँक सखी योजना’ सुरु करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून स्वयंसहायता बचत गटांना मार्गदर्शन करणे, आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचे काम बँक करणार आहे.
बँकेने सायबर सिक्युरिटीला प्राधान्य दिलेल्या असून या संदर्भातील विविध निकषांचे पालन केल्याने बँकेच्या डाटा सेंटरला ISO 27001:2013 चे नामांकन प्राप्त झाले आहे. आज DBT / PFMS / NACH या सुविधांमुळे शासकीय अनुदानाच्या रकमा बँकेकडील लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होत आहे. जिल्हा बँकेला लवकरच नेट बँकींगची सुविधा मिळणार असून अशी सुविधा मिळविणारी राज्यातील पहिली जिल्हा बँक ठरणार आहे.

बँकेने ग्रीन चॅनेल सुविधेमध्ये आणखी एका नव्या सुविधेला प्रारंभ केला असून आपल्या बँके व्यतिरिक्त अन्य बँकेचा ग्राहक यांचेकडील कोणत्याही बँकेचे एटीएम् कार्ड वापरून रक्कम काढू शकतो. ही सुविधा बँकेच्या ९८ शाखांमधून सुरू केली आहे. आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यवसाय व्यस्ततेमुळे शाखेत प्रत्यक्ष येऊ न शकणारा व्यापारी वर्ग इत्यादीसाठी बँकेने अल्पबचत प्रतिनिधीमार्फत मायक्रो एटीएम् डोअर स्टेप बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे.
शासन पुरस्कृत विविध योजनांमध्ये बँकेने सहभाग घेतला असून या योजनांचा लाभ बँकेच्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकेकडून सक्रियपणे काम केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महिलांचे जलद गतीने झिरो बॅलन्स ने खाते उघडून खाते आधार लिंक करून देण्याचे काम बँकेने सुरू केले आहे. याचबरोबर इको फ्रेंडली गणेश मूर्ती, रक्तदान शिबिर, व्यावसायिक प्रशिक्षण, एनजीओ मार्फत विकासात्मक कामे, बचत गटांना प्रशिक्षण व मार्केटिंग साठी सहाय्य इत्यादी माध्यमातून बँक सामाजिक बांधिलकी जपत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेल्या एका वर्षात बँकेने एकूण व्यवसायामध्ये रु. ५५२.८० कोटींची भरीव वाढ केली असून माहे मार्च २०२५ अखेरपर्यंत बँकेचा एकूण व्यवसाय रु. ६००० कोटी पर्यंत नेण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. सदैव ग्राहकाभिमुख सेवेद्वारे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्ग, सर्व वयोगटातील ग्राहक वर्ग, नोकरदार महिला वर्ग, विद्यार्थी यांच्यासाठी उत्तमोत्तम बँकिंग सेवा देण्यास बँक कटिबद्ध असल्याचे श्री. मनिष दळवी म्हणाले.
यावर्षी बँकेने मिळविलेला नफा, राबविलेल्या विविध योजना, केलेला व्यवसाय इत्यादीसाठी सभासदांमधुन अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले. बँकेच्या यशस्वीतेमध्ये बँकेच्या सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व जिल्हा वासियांचा मोठा वाटा राहीला आहे. असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करुन जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!