रस्ते गेले पाण्याखाली ; वाहतूक ठप्प ; पोलीस प्रशासन सतर्क
कणकवली : शहरालगत असलेल्या आशिये गावातील खालचीवाडी येथील भातशेतीत गड नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसले. तसेच गावचे ग्रामदैवत गांगोभैरी मंदिराकडे गडनदी फुटल्याने ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेली काही वर्ष येथील ग्रामस्थांकडून नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी सातत्याने प्रशासनाकडे केली जात आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पुराचे पाणी घुसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे खालचीवाडी येथील ३० ते ३५ घरांचा संपर्क तुटला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान यासंदर्भात आशिये सरपंच महेश गुरव यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून भात शेतीचे नुकसान व पुराचे पाण्याची नोंद प्रशासनाने घ्यावी, असे सांगितले.
तर दुसरीकडे कणकवली तालुक्यातील शिवडाव हलवल मार्गावर झाड पडून वाहतूक तब्बल अडीच तासापेक्षा जास्त वेळ ठप्प झाली होती. तर पर्यायी मार्ग असलेला हळवल भाकरवाडी शिवडाव रस्ता हा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे बंद झाला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर कानानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले होते. तसेच शिवडाव राऊळवाडी येथील पुलावरून पाणी जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवडाव व हळवळ भाकरवाडी गावांचा संपर्क तुटला होता.
तसेच कणकवली ते आचरा जाणाऱ्या रस्त्यावर वरवडे उर्सुला स्कूल येथे पाणी भरल्याने बंद मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला होता. साधारणपणे या मार्गावर रस्त्यापासून तब्बल चार ते पाच फूट पाणी साचले होते. यावेळी खबरदारी म्हणून कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतुक पोलीस हवालदार विनोद चव्हाण व आर. के. पाटील यांच्या पथकाचा बंदोबस्त आचरा मार्गावर ठेवण्यात आला होता.