कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे कोसळलेली दरड हटवून कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली असली तरी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. कोकण रेल्वेने मंगळवारीही चार गाड्या रद्द कराव्या लागल्या. चार गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले तर तीन गाड्या प्रचंड उशीराने धावत होत्या. रविवारी सायंकाळी दिवाणखवटी येथे दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे तब्बल २६ तास ठप्प होती. रेल्वेरुळावर दगड, माती आणि चिखल जमा झाला होता. रेल्वेरुळ सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अथक प्रयत्न करावे लागले होते. सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता रेल्वेरुळ गाड्या धावण्यासाठी सज्ज झाला. सोमवारी सायंकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी पहिली गाडी मांडवी एक्स्प्रेस धावली. त्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली. मात्र, तरीही कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. या मार्गावरील चार गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्र.२०११२ मडगाव जं.- मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस, गाडी क्र.११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्स्प्रेस, गाडी क्र.५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजर, गाडी क्र. १२०५१ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव जं. जनशताब्दी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. त्याचबरोबर चार गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये गाडी क्र. १६३११ श्री गंगानगर-कोचुवेली एक्स्प्रेस, गाडी क्र. २२११९ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव जं. तेजस एक्स्प्रेस, गाडी क्र. १९५७७ तिरुनेलवेली जामनगर एक्स्प्रेस, गाडी क्र. १८०४७ शालीमार – वास्को दा गामा एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एर्नाकुलम हजरत निजामुददीन एक्स्प्रेस ही चार तास उशीराने धावत आहे. तिरुनवेली – जामनगर एक्स्प्रेस ही साडेबारा तास उशीराने धावत आहे. कोचुवली-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस चौदा तास उशीराने धावत आहे.