28.3 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

बहुविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांचा प्रारंभ

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा उपक्रम ; अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती

कणकवली | मयुर ठाकूर : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, कनिष्ठ महाविद्यालय आणि बालमंदिर विभागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. पर्यावरणपूरक, कौशल्य विकास साधणारे आणि सर्वांगीण विकासाचे परिपूर्ण शिक्षण देत असताना प्रशालेचा गुणवत्तापूर्ण निकाल लागत आहे. त्यामुळे हे यश मिळाले आहे. संस्थेचे सत्तराव्या वर्षात पदार्पण होत असताना ७ जुलैपासून नव्याने बहुविध कौशल्य विकास अभ्यासक्रम आम्ही प्रशालेत सुरू करत आहोत, अशी माहिती कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

ते कनेडी येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. संस्थेच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते नव्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे उद्घाटन होणार आहे. रविवारी ७ जुलैला सकाळी दहा वाजता संस्थेचा वर्धापन साजरा होत असल्याची माहितीही सावंत यांनी यावेळी दिली. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष आर.एच. सावंत, संस्थेचे सनदी लेखापाल तुकाराम रासम, अंतर्गत हिशेब तपासनीस रवींद्र सावंत, शालेय समितीचे सदस्य बावतीस घोन्साल्विस, प्राचार्य सुमंत दळवी आदी उपस्थित होते. कनेडी शिक्षण संस्थेची स्थापना ४ जुलै १९५४ रोजी झाली. त्यानंतर संस्थेच्या एकूण वाटचालीत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला, मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये संस्थेने विविध उपक्रम सुरू केले. हे उपक्रम शासनाच्या विविध निकषात बसत असल्यामुळे’ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाचे सर्व निकष आम्ही पूर्ण केले. त्यामुळे तालुकास्तरावर ३ लाख आणि जिल्हास्तरावर ११ लाखांचे पारितोषिक या संस्थेला मिळाले आहे.

संस्थेच्या प्रांगणात ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दहावी आणि बारावीचा शंभर टक्के निकाल लागत असतानाच राज्य आणि केंद्र स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षांमध्येही विद्यार्थी यशस्वी होत आहेत. या शाळेचा विद्यार्थी हा परिपूर्ण व्हावा, या हेतूने विविध क्रीडा क्षेत्रातही सांधिक काम शिक्षकांनी केले आहे. म्हणूनच कॅरम स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर विजय मिळवलेल्या संस्थेचे विद्यार्थी राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करत आहेत. अलीकडेच केंद्र शासनाच्या खेलो इंडिया या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोवा विभागामध्ये एका विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

विद्यार्थी सक्षम बनला पाहिजे

विद्यार्थी सक्षम बनला पाहिजे म्हणून आतापासूनच कमवा आणि शिका हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी अकरावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी शिवण कला हा विषय देण्यात आला आहे. एमपीएससी, यूपीएससी आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आमचे विद्यार्थी यश मिळवत आहेत, असेही ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!