कणकवली : शासनाच्या रास्त दराच्या धान्य दुकानातील जून २०२४ मधील धान्य १५ जुलै २०२४ पर्यंत वितरित करण्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिली. जून २०२४ मधील धान्य मुळातच उशिराने प्रशासनाकडून रेशन दुकानांवर वितरित झाले. त्यामुळे रेशन दुकानांवरील धान्य लाभार्थ्यांपर्यंत पूर्ण वितरित झाले नाही. सबब जून २०२४ मधील धान्य वितरित करण्यासाठी १५ दिवस मुदतवाढ मिळावी अशी विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी मंत्री छगन भुजबळ यांची 4 जुलै रोजी प्रत्यक्ष भेट घेत लेखी निवेदनाद्वारे केली. त्यावर मंत्री भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला 15 दिवस अधिक मुदतवाढ धान्य वितरित करण्यासाठी आदेश दिले. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो रेशनधान्य लाभार्थी ना होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, डॉ संजय मालंडकर, शिवसेना कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते.