सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कोल्हापूर संस्थानात दुर्बल वंचित उपेक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. त्याची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला असणे आवश्यक आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आपण जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन बोर्टीचे समतादूत सगुण जाधव यांनी आज येथे केले. सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय सम्मेलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता श्री पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी ओरोस येथे करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूपतसेन सावंत, संचालक नूतन परब, समाज कल्याण अधिकारी सुनील बागुल, संतोष परुळेकर, रवी जाधव, बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, स्काऊट गाईडचे अधिकारी गायकवाड, सुजित जाधव, सुहास मोचेमाडकर, राजू दिनदयाळ, संग्राम कासले आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेते निता सावंत, सानिका वायंगणकर, राजन जाधव, संजय तांबे यांना रोख रक्कम, चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सुनील बागुल यांनी शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भूपतसेन सावंत यांनी सामाजिक न्याय विभाग व बार्टीचा उपक्रम सत्य असल्याचे सांगितले तर नूतन परब यांनी अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन शाळा महाविद्यालयात होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले तर आभार विजय कदम यांनी मानले.