कणकवली | मयुर ठाकूर : सध्याच्या काळात अनेक तरुण एकवेळ जेवणाचा त्याग करतात, पण अमली पदार्थांचा त्याग करत नाहीत. ही खरी शोकांतिका आहे. व्यसनापासून दूर राहणे हे एक आव्हान आहे. प्रलोभनाला बळी पडणारी तरुणाई बेफाम होता नये. याची काळजी घेतली पाहिजे. तिला लगाम घातला पाहिजे.असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार प्रकाश गवस यांनी केले.
फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेना विभाग व जिल्हा वाहतूक शाखा, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
डॉ. राज ताडेराव यांनी प्रास्ताविक केले.ते म्हणाले, मागील काही कालावधीतील घडामोडींचा विचार केला तर व्यसनाधीन तरुण ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
प्रकाश गवस म्हणाले की,तरुणाईची बेपर्वाई ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आपल्या पाठीमागे घरी कोणीतरी वाट बघत आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीकडून कधी काही खाऊ नका. प्रवासामध्ये असे अनेक प्रसंग येतात त्यावेळी आपण फार सावध राहिले पाहिजे. अन्यथा आपली लूट निश्चित आहे. समाजातल्या घातक गोष्टी पासून सावध राहिले पाहिजे.
डॉ. संतोष रायबोले म्हणाले, व्यसन ही एक समाजाला लागलेली कीड आहे. आजच्या दिवशी आपण ठरवले पाहिजे की, आपल्याला जगायचे आहे की मरायचे आहे. या अमली पदार्थातून आपण दारिद्र्य विकत घेतो. अमली पदार्थ विकणारी कंपनी आपल्या जीवावर श्रीमंत होते. तरुणांच्या आदर्श असलेल्या व्यक्ती वाईट गोष्टींचा प्रचार व प्रसार करतात. त्यामुळे आपण यापासून सावध राहिले पाहिजे. आपले जीवन समृद्ध करण्यासाठी व्यसने दूर ठेवली पाहिजेत. असे आवाहन केले.
डॉ. राज ताडेराव यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. संतोष जोईल यांनी आभार मानले. डॉ. सतीश कामत, प्रा. संतोष आखाडे, प्रा. जगदीश राणे, प्रा. नारींगकर, प्रा. ए.के.पाटील यांच्यासह महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने सीनिअर व ज्युनिअर महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळ- फोंडघाट महाविद्यालयात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार प्रकाश गवस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी डॉ .राज ताडेराव, डॉ.संतोष रायबोले आदी उपस्थित होते.