गौरीशंकर खोत भाजपाच्या वाटेवर ? ; राजकीय वर्तुळात खळबळ
कणकवली | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणुकीत खासदार पदी निवडून आल्याबद्दल खा. नारायण राणे यांचे शिवसेना उबाठाचे उपनेते गौरीशंकर खोत यांनी थेट राणेंच्या मुंबई येथील अधिश बंगल्यावर जात अभिनंदन केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उबाठा चे शिवसेना सचिव विनायक राऊत यांचा पराभव करत खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भुईसपाट केले. त्यानंतर गौरीशंकर खोत यांनी मुंबई येथे खा. राणेंच्या बंगल्यावर जात त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सौ. नीलम राणे, आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.
आ. नितेश राणेंनाही पुष्पगुच्छ देत लोकसभा निवडणुकीत दाखविलेल्या कौशल्याबद्दल खोत यांनी अभिनंदन केले. एकीकडे स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून अद्याप सावरले नसताना गौरीशंकर खोत यांनी राणेंची भेट घेत केलेल्या अभिनंदनामुळे गौरीशंकर खोत हे पुन्हा एकदा राणेंसोबत जात भाजपात पक्षप्रवेश करणार काय ? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उबाठा शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत हे पूर्वीच्या काळात नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार होते. मात्र मध्यंतरी च्या काळात गौरीशंकर खोत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहत राणेंच्या विरोधात राजकारण केले. मात्र आज खोत यांनी खा. राणेंसह राणे कुटुंबीयांच्या घेतलेल्या भेटीमुळे शिवसेना उबाठा च्या गोटात खळबळ उडाली आहे.