सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : ३३ वर्षे वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून सामाजिक भान आणि सामाजिक चळवळ जपली पाहिजे. अशी शिकवण आपल्याला वडिलांकडून लहानपणीच मिळाली. त्यांनी दिलेला समाजसेवेचा वसा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विचारांचे कार्य पुढे नेणार आहोत, असे प्रतिपादन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले.
सामाजिक कार्य करत असताना १० हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. चित्रकला, निबंध, मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. महिला बचत गट, जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात येतो. दरवर्षी रक्तदान शिबीर घेण्यात येते यापुढेही अशाच सामाजिक कार्याचा वारसा जोपासला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कै. श्रीधर नाईक यांचा ३३ वा स्मृती दिन २२ जून रोजी कणकवली येथील कै. श्रीधर नाईक चौक येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात सुशांत नाईक बोलत होते.
यावेळी रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिला बचत गटांचा सत्कार श्रीधरराव नाईक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला.