22.3 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे सुमारे बारा लाखाचे नुकसान

सर्वाधिक नुकसान आरे नरेवाडी येथे ; तहसीलदार व मंडल अधिकारी पाहणीसाठी न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

देवगड : तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह लागलेल्या मुसळधार पावसाने व त्यात आलेल्या जोरदार सोसायटीच्या वाऱ्याने आरे नरेवाडी येथील चार घरांची छप्परे आंबा कलमे, काजू, फणस, रतांबा आदी झाडे कोसळल्याने सुमारे १२ लाखाचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान आरे नरेवाडी येथे झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे गावचा विद्युत पुरवठा पूर्णतः खंडितही झाला होता.

विद्युत पोल ही तुटून पडले होते. गुरुवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान झालेल्या वादळाची भीषणता इतकी भयानक होती की घरावरील छपराचे पत्रे वाऱ्याने उडून फुटत शंभर ते दीडशे मीटर पेक्षा जास्त उडाले. शिवाय चिऱ्याच्या भिंतींनाही भेगा पडल्या. घरातील सिलिंग फॅन ही घराच्या बाहेर फेकला गेला. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

गुरुवारी दुपारी घटना घडुनही शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरूच होती .मात्र एवढी मोठी घटना घडवून देखील तालुक्याचे तहसीलदार व मंडल अधिकारी तिथे न फिरल्याने आरे येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

देवगड तालुक्यात उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवार पासून दमदार सुरुवात केली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे तालुक्यात बरेच नुकसान झाले आहे. याच पावसात वादळी वाऱ्यासह वीज पडून वीज कंपनीचे देखील नुकसान झाले आहे.देवगड तालुक्यातील एका शाळा परिसरात वीज पडली.मात्र सुदैवाने शालेय वर्गाच्या रूमच्या सर्व खिडक्या बंद असल्याने अनर्थ टळला.मिठबाव येथेही विपुल रूमडे यांच्या घरावर झाड पडून सुमारे २० हजाराचे नुकसान झाले आहे. तर देवगड तालुक्यातील आरे गावात सर्वाधिक नुकसान पावसाने झाली आहे. आरे गावापासून दोन किलोमीटर माळरानावर असलेल्या आरे नरेवाडी येथे चार घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यातील दोन घरांचे मालक मुंबईला होते तर दुसऱ्या दोन घरातील व्यक्ती घरात राहत होत्या मात्र मोठ्याने आवाज झाल्याने त्या तात्काळ घराबाहेर आल्या. यातील एका घरात महिला एकट्याच होत्या. त्यांनी घराचे छप्पर उडताना पाहिलं मात्र स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तेथे टीव्हीसाठी भिंतीवर बसविलेल्या कडाप्याच्या खाली त्या उभ्या राहिल्याने त्या सुदैवाने या घटनेत बचावल्या अन्यथा अनर्थ घडला असता.

सूर्यकांत नरे यांच्या घराचे सुमारे ३ लाखाचे नुकसान

सूर्यकांत नाना नरे यांच्या कौलारू घराची वादळाने कौले उडून गेली तर घराचे काही वासे मोडले. अंगणासमोर घातलेला मंडपही मोडला आहे. घराचे सिमेंट पत्रे देखील उडून गेले आहेत घरातील धान्याचे देखील भिजल्याने नुकसान झाले आहे .यांच्या घराची १००० कौले, ३६ पत्रे १५० वासे, १०० रिप, १ माड,५० काजू कलमे,२ आंबा कलमे,१ चिकू असे मिळून अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

नारायण नरे यांच्या घराचे सुमारे ४ लाखाचे नुकसान

नारायण भिकाजी नरे यांच्या पत्नी सुनंदा नरे या घरी दुपारी एकट्याच होत्या. अचानक मोठ्याने आवाज झाला व घराचे छप्पर उडून गेलं. त्यामुळे त्या भीतीने घराच्या भिंतीलाच टीव्ही ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या कडप्पाच्या खाली त्या आपल्या जीव वाचविण्यासाठी बसून राहिल्या. क्षणार्धात वादळ शांत झाल्यावर त्या घराबाहेर आल्या तेव्हा पाहिले . त्यांच्या घराच्या छपराचे सिमेंट पत्रे लोखंडी अँगल सहित घरापासून जवळजवळ ६० ते ७० फुटापर्यंत फुटून उडून गेले. चिऱ्याचे खांबानाही भेगा घेल्या आहेत. सुनंदा नरे यांचे ६० सिमेंट पत्रे,२ सागाची झाडे,१ शिवन झाड,तसेच त्यांच्याच कंपाउंड मधील फणस ,रतांबा ही झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. या वादळामुळे त्यांचे सुमारे ४ लाखाचे नुकसान झाले आहे .

पांडुरंग खरात यांचे ७० हजाराचे नुकसान

येथील पांडुरंग खरात हे वयस्कर असल्याने एकटेच घरात राहत होते. मात्र काही दिवसापूर्वी त्यांच्या मुलगा दीपक याने त्यांना मुंबई येथे नेले होते . ते मुंबईला असल्याने हे घर बंद होते. मात्र या घराच्या छपराचे ७० सिमेंट पत्रे उडून सुमारे ७० हजाराचे नुकसान झाले आहे. वादळामुळे नुकसान झाल्याची माहिती त्यांना फोनवर दिल्यानंतर ते मुंबईतून सकाळी गावात येऊन त्यांनी आपल्या घराची पाहणी केली असता घराच्या शौचालयाचे पत्रे व घरातील धान्य सामान देखील भिजून नुकसान झाले आहे .

गणपत काळे यांचे ४ लाखाचे नुकसान

येथीलच गणपत धोंडू काळे हे मुंबई येथे राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. मात्र त्यांच्या घरासमोर असलेले मोठे झाड मुळासहित उन्मळून कोसळले. घराचे छप्पर देखील वादळाने उडून गेले . घराच्या छपरा वरील सिलिंग फॅन घरापासून लांब पंधरा फूट लांब अंतरावर वादळाने उडून गेला. या वादळात काळे यांचे घराच्या छप्पराचे ३३ सिमेंट पत्रे, १५ काजू कलमे, ३० आंबा कलमे, असे मिळून चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान आरे नरेवाडीत झालेल्या नुकसानाची माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, माजी सरपंच महेश पाटोळे, आरे सरपंच सौ ममता कदम, पोलीस पाटील राजेंद्र कदम, उपसरपंच रत्नदीप कांबळे,ग्रामसेवक राऊळ यांच्यासह गावातील नागरिकांनी तात्काळ मदत कार्य पोहोचविण्याचे प्रयत्न केले. भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी आरे येथे जात घटनास्थळाची पाहणी करून आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच शासनाची देखील जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले.

गुरुवारी दुपारी चार वाजता चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आणि यात आरे नरेवाडी येथील चार घरांचे नुकसान झालं आहे. अंदाजे ११ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी तलाठी लक्ष्मण बोडके यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!