मालवण : तालुक्यातील कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव परबवाडा क्रमांक दोन या शाळेचे छप्पर कोसळल्याची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने छप्पर कोसळलेल्या भागातील वर्गात मुले व शिक्षक कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. गेले दोन वर्षे या शाळेच्या दुरुस्तीकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगत शिक्षण विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव परबवाडा क्रमांक दोन या शाळेतही आज पहिल्या दिवसाची गजबज सुरु होती. विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आटोपल्यावर अचानक शाळेचे छप्पर कोसळले. दुरवस्था झालेले हे छप्पर गेले दोन, तीन दिवस पडलेल्या पावसामुळे आणखी मोडकळीस येऊन ऐन शाळेच्या पहिल्या दिवशी कोसळले. शाळेच्या अर्ध्या भागाचे छप्पर कोसळले असून त्या भागातील वर्गांमध्ये विद्यार्थी किंवा शिक्षक असे कोणीही नसल्याने सुदैवाने अनर्थ टळला. छप्पराचे सर्व वासे कोसळून कौले देखील फुटून गेली. छप्पर कोसळून शाळेतील कपाट, फर्निचर, फॅन व विद्युत जोडणी व इतर साहित्य यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात धडकी भरली. शाळेचे छप्पर कोसळल्याचे समजताच गावातील पालक व ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी कोसळलेले छप्पर बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी सरपंच रणजित परब, तलाठी श्री. शिंदे, पोलीस पाटील शितल परब, ग्रामसेवक सागर शिंदे यांनी नुकसानीची पाहणी करत पंचनामा केला. तर शिक्षण विभागातर्फे केंद्रप्रमुख श्री. बागवे यांनी शाळेला भेट देत पाहणी केली. या शाळेच्या छप्पराची दुरवस्था झालेली असताना गेली दोन वर्षे ग्रामस्थ तसेच शिक्षकांकडून शाळेच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्तीबाबत कोणतेही काम झाले नाही. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच आज शाळेचे छप्पर कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शिक्षण विभागाच्या कारभारावरही ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.