सावंतवाडी : पावसाळा सुरू झाल्याने आंबोली घाटात लवकरच वर्षा पर्यटन सुरू होणार असल्याने वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सामूहिक स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता मोहिमे अंतर्गत घाट सुरु होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे १० किमी अंतराच्या रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, शनिवार दिनांक १५ जून पासून आंबोली घाट तसेच धबधबा परिसरात अस्वच्छता करणे तसेच माकड व वानर यांना खाऊ घालणे यासाठी १ हजार रुपयांचे उपद्रव शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात दंगा करणाऱ्या बेधुंद पर्यटकांना आळा बसणार आहे.
कोकणचे वैभव असलेल्या आंबोली घाट व धबधबा यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने तसेच निसर्गावर घाला घालणाऱ्या अशा कचऱ्याचे उच्चाटन करण्याच्या हेतूने शुक्रवारी सकाळपासून उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या संकल्पनेतून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सर्व एकत्रित केलेला अंदाजे १ टन कचरा हा सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आला. सदरची स्वछता मोहीम ही सावंतवाडी वनक्षेत्रपाल-मदन क्षीरसागर, देवसू वनपाल-नागेश खोराटे, आंबोली वनपाल-नामदेव चौगुले यांचे नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यामध्ये सावंतवाडी परीक्षेत्र व आंबोली परीक्षेत्र मधील सर्व अधिकारी- कर्मचारी सहभागी झालेले होते. यासोबतच धबधब्यावर स्टॉल लावणारे स्टॉलधारक, काही आंबोली ग्रामस्थ, संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोलीचे सर्व सदस्य यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
दरम्यान, शनिवार दिनांक १५ जून पासून आंबोली घाट तसेच धबधबा परिसरात अस्वच्छता करणे तसेच माकड व वानर यांना खाऊ घालणे यासाठी १ हजार रुपयांचे उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे. राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या अशा आंबोली घाटातील जैवविविधता टिकवणे, अनिर्बंधीत पर्यटनावर चाप लावणे तसेच माकडांना खाऊ घालण्यामुळे त्यांच्या मानवावरील हल्ले व सवयी मध्ये होणारे बदल रोखणे यासाठी हे कडक निर्बंध वन विभागाने लागू केले असल्याचे जिल्ह्याचे वन विभाग प्रमुख, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले आहे.
आंबोली घाट तसेच धबधबा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी असून त्याची पर्यटकांनी व सुजाण नागरिकांनी नेहमीच जाण ठेवावी. तरी आंबोली घाटातील निसर्ग व जैविविधता टिकविण्यासाठी सर्व नागरिक व पर्यटक यांना वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.