कुडाळ : प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. श्री. अभिजित पानसे यांनी आज कुडाळ भेटीदरम्यान कुडाळ मधील रंगकर्मी श्री. केदार सामंत यांच्याबरोबर विवीध सांस्कृतिक विषयावर चर्चा करुन लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष श्री. धिरज परब उपस्थित होते. केदार सामंत यांनी कुडाळ मधील सर्व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती अभिजित पानसे यांना देऊन शालेय शिक्षणक्रमात इयत्ता पहिली पासून ललित कलांचे शिक्षण समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
त्याचप्रमाणे येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात मंजूर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या “डिप्लोमा इन ॲक्टिंग स्किल्स” या अभ्यासक्रमाचीही माहिती केदार सामंत यांनी दिली व नाट्य प्रशिक्षणाबाबत मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जागृती निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यावेळी अभिजित पानसे यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करून येथील सांस्कृतिक चळवळ समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.