कणकवली : बाजारातील दरापेक्षा कमी किमतीत आणि घरपोच वस्तू मिळत असल्याने अलीकडे ऑनलाइन खरेदीकडे अनेकांचा कल वाढत आहे. शहरातून दररोज दोन ते तीन लाखांपेक्षा जास्त ऑनलाइन वस्तूंची खरेदी केली जात आहे. या खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठेवर मात्र परिणाम होत असल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत.
शहरातील विविध व्यापारी संकुलांतून किराणा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, भांड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानात ग्राहक येत असले तरी त्याची संख्या हाताच्या बोटावर मोजता येणारी इतकीच आहे. मात्र, कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अगदी किराणा मालापासून ते गृहोपयोगी, लहानातल्या लहान वस्तूपासून ते मोठ्या वस्तू पुरविण्याची व्यवस्था केल्याने आता स्थानिक दुकानदारांना ग्राहकांची वाट पाहावी लागते. ऑनलाइन शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून अनेक वस्तू कमी किमतीत मिळत असल्याने ग्राहकांचा ओढा त्याकडे अधिक आहे. त्याचा प्रत्यक्ष दुकानदारांच्या व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. गेली दहा ते बारा वर्षे नोकर भरती नसल्यामुळे गावाकडची जागा विकून शहरात भाड्याने जागा घेत व्यवसाय थाटलेल्या व्यावसायिकांपुढे आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.