अल्पसंख्याक सेल भाजप तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले यांची आ. नितेश राणे यांच्याकडे मागणी
कणकवली : जिल्ह्यात पवित्र प्रणाली पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ उर्दू शाळा असून त्यामध्ये अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र यातील काही पदे पवित्र प्रणाली पोर्टलद्वारे भरण्यात आली. तसेच काही पदे न भरता सर्व रिक्त पदे प्रशासनाने भरावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे कणकवली तालुका अल्पसंख्याक सेल भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, आमच्या जिल्ह्यामध्ये उर्दू माध्यम च्या एकूण सव्वीस शाळा आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक हे मातृभाषेतून मिळविण्याचा हक्क प्रत्येक बालकाला आहे. सिंधुदुर्गसारख्या डोंगराळ जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. व ती पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार म्हणजे अर्थातच प्रशासनाची आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढावी, शाळा टिकाव्यात, दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही समाज म्हणून सतत प्रयत्नशील असतो.
गेली कित्येक वर्ष शिक्षक भरती नव्हती. त्यातच प्रशासनाने पदे रिक्त असताना नवीन शिक्षक भरती होणार आहे, हे कारण देत आंतरजिल्हा बदल्या केल्या त्यामुळे उर्दू माध्यम शाळांचे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहिली. नवीन भरती होणाऱ्या आशेवर आम्ही शिक्षक भरतीची वाट पाहत असताना आमची घोर निराशा झाली. कारण मराठी माध्यमांचा रिक्त पदांवर थोडीशी पदे भरण्यात आली. परंतु उर्दू माध्यम ची पंचवीस पदे रिक्त असताना आपल्या प्रशासनाने पहिल्या फेरीमध्ये फक्त अकरा पदे रिक्त व दुसऱ्या फेरीमध्ये केवळ सात अशी एकूण अठरा पदेच रिक्त दाखविण्यात आली. त्यापैकी पहिल्या फेरीमध्ये फक्त आठ उमेदवारीच नियुक्ती स्वीकारली. त्यामुळे आमची अशी विनंती आहे की, पहिल्या फेरीतील तीन पदे व दुसऱ्या फेरीतील पाच अशी किमान दहा पदे दुसऱ्या टप्प्यामध्ये भरण्यात यावी, शक्य झाल्यास सर्वच पंचवीस रिक्त पदे भरण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील उर्दू माध्यम शाळांचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी मुलांची व शाळांची तपासणी सातत्याने उर्दू माध्यम विस्तार अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी. गेल्या शैक्षणिक वर्ष सन २०२३/२०२४ मध्ये बहुतांश शाळांची वार्षिक शैक्षणिक तपासणी झाली, नसल्याचे समजते. चालू वर्षात तरी सातत्याने शैक्षणिक वार्षिक तपासणी होण्यासंबंधित आदेशित करावे. मराठी माध्यमाची पुरेशी पदे भरली असताना उर्दू माध्यम शाळांवर अन्याय का ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तरी विनंती आहे की, उर्दू माध्यम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन जिल्ह्यातील सर्वच उर्दू माध्यम शिक्षकांची पदे भरण्यास व उर्दू माध्यम शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास यावा, असे निवेदनात म्हटले आहे.