सिंधुदुर्ग/ देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मुलगा झाला, परंतु त्याला पाहण्याअगोदरच मातेने अखेरचा श्वास घेतला. ही ह्दयद्रावक व दुर्दैवी घटना देवगडमध्ये घडली असून, प्रसुतीसाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल केलेल्या इळयेसडा येथील साक्षी सचिन थोटम (२८) या महिलेचा प्रसुतीमध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्त्रावाने केवळ चार तासातच जिल्हा रूग्णालयात नेताना मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इळयेसडा येथील सौ.साक्षी सचिन थोटम (२८) या महिलेला १८ मे रोजी रात्री ८.०५ वाजता प्रसुतीसाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला पहिला मुलगा असून दुसèऱ्या प्रसुतीसाठी तिला दाखल करण्यात आले होते. प्रसुती होऊन त्यांना मुलगा झाला. मात्र, काही क्षणातच त्यांना अतिरक्तस्त्राव होऊ लागल्याने देवगड ग्रामीण रूग्णालयातून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तपासणीअंती मध्यरात्री १२.३० वा. सुमारास डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. केवळ चार तासातच मुलाला जन्म दिल्यानंतर मातेचा अतिरक्तस्त्रावाने दुर्दैवी मृत्यु झाला.
याबाबत खबर महिलेचे पती सचिन अनंत थोटम (३९) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणुन नोंद केली आहे. तपास पो. हे. कॉ. राजन जाधव करीत आहेत.