सावंतवाडी | प्रतिनिधी : आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल ची सेवा चांगले मिळण्यासाठी प्रयत्न करा. गेले काही दिवस आणि टॉवर नादुरुस्त असल्यामुळे त्याचा फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे योग्य ती सकारात्मक भूमिका घ्या, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. गावागावात बीएसएनएलचे चांगले नेटवर्क आहे. परंतु त्या ठिकाणी सेवा मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कारणे न देता अधिकाऱ्यांनी तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे नमुद केले आहे की, लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले आता शिक्षक निवडणूक लागली आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाली नाही. प्रशासनाने ग्राहक सेवा देण्यासाठी आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी. सध्या चाकरमानी लोक गावागावात आले आहेत. ग्रामीण भागात बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र सेवा मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांना शहरात धाव घ्यावी लागते असे राऊळ यांनी म्हटले आहे. बीएसएनएलचे मंजूर टाॅवर उभारण्यात यावे आणि बंद अवस्थेत असलेल्या टाॅवरची देखभाल दुरुस्ती करून ते सुरू केले पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांना मोबाईल सेवा सुरळीत मिळाली पाहिजे म्हणून जिल्हाधिकारी, दूरसंचार जिल्हा प्रबंधक यांनी आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत चालू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ग्राहकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे साधन मोबाईल सेवा आहे. त्यामुळे सर्वांचीच मागणी सेवा सुरळीत मिळाली पाहिजे अशीच आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले. बीएसएनएलने जलदगतीने याबाबत कारवाई करावी आणि ग्राहकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे साधन मोबाईल सेवा असल्याने ती सुरळीत चालू करावी अशी मागणी रुपेश राऊळ यांनी केली आहे.