भरल्या वर्गात अमोलने घेतला निरोप; काही क्षणात होत्याचे झाले नव्हते
टोपीवाला हायस्कुल येथे स्नेहमेळावा सुरू असतानाची दुर्दैवी घटना
मालवण : सर्व शाळा सोबती एकत्र येणार याचा उत्साह प्रत्येकाच्या मनात मोठा होता… अमोल सर्वांना एकत्रित आणण्यासाठी पुढे होता. शाळेच्या वर्गात एक एकजण जमा झाले… प्रत्येकाची भेट सुरु असताना अमोलचे कौतुक प्रत्येकाच्या तोंडावर होते… अन सारे वर्गमित्र हास्यविनोदात तल्लीन झाले असतानाच अमोलने सर्वांचा निरोप घेतला… काही क्षणात होत्याचे नव्हते झाले… हसणारी मुले दुःखाच्या सागरात बुडून गेली…मालवण टोपीवाला हायस्कूल सन २००३ दहावी बॅचचे विद्यार्थी, विद्यार्थिनी २१ वर्षांनी गेटगेदर निमित्ताने एकत्र आले होते. टोपीवाला हायस्कुल येथे सर्वांच्या सहभागातून गेटगेदर सूरू असताना अमोल सुरेंद्र परब (३६) रा. मालवण यांची तब्येत अचानक बिघडली ते अत्यवस्थ बनले. उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने उपस्थित सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
शासकीय इलेक्ट्रीक ठेकेदार म्हणून कार्यरत असलेले अमोल सुरेंद्र परब (वय ३६) हे २००३ दहावी बॅचचे विद्यार्थी होते. टोपीवाला हायस्कुल येथील माजी विद्यार्थी गेटगेदर आयोजनातही त्यांचा उत्स्फूर्त पुढाकार होता. घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त केला जात आहे. अमोल याच्या पश्चात पत्नी, आई, वडिल, भाऊ, भावजय, पुतणी असा परिवार आहे. अमोल याच्या निधनाची माहिती कळताच शहरातील नागरिकांनी आणि त्याच्या मित्रपरिवाराने शिक्षक वर्ग यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली होती. अनेकांचे डोळे पाणावले.
अमोल परब हे मनमिळावू व हसतमुख स्वभावाचे होते. ते शासकीय इलेक्ट्रीक कॉन्ट्रक्टर म्हणून परिचीत होते. तसेच पर्यटन व्यावसायिक म्हणूनही ओळखले जात. गेले दोन दिवस ते आपल्या बॅच समवेत विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मालवण टोपीवाला हायस्कुल येथील २००३ दहावी बॅच व २००५ बारावी बॅच २१ वर्षांनंतर सर्वजण एकत्रित आले होते. शनिवारी टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित गेटगेदर कार्यक्रमात सहभागी झाले असताना दुपारी अचानकपणे त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनली. सहकारी मित्रांनी त्याना तात्काळ खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी ते मयत झाल्याचे घोषित करण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. परब याच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सेवानिवृत्त एसटी अधिकारी सुरेंद्र परब, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. परब यांचा अमोल हा मुलगा होय. गोवा येथील हॉटेल व्यावसायिक प्रसाद परब यांचा तो लहान भाऊ तसेच माजी नगरसेविका सौ. संध्या परूळेकर व उद्योजक राजन परूळेकर यांचे ते जावई होत.
माजी विद्यार्थी मेळावा रद्द
टोपीवाला हायस्कूल येथे २००३ दहावी बॅच गेटटुगेदर दिवसभर सुरू होते. त्या सोबत सर्व माजी विद्यार्थी यांच्या सहभागतून आणखी एक एकत्रित मेळावा शनिवारी दुपारी ३:३० वा. आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थी अमोल परब यांच्या आकस्मिक निधनानंतर माजी विद्यार्थी यांचा मेळावा संघटनेने रद्द केला. मेळाव्यासाठी अनेक माजी विद्यार्थी दुपारनंतर टोपीवाला हायस्कूलमध्ये उपस्थित झाले होते. मात्र परब यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी दुखः व्यक्त केले.