कणकवली : शहरातील बांधकाम व्यवसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुशांत जनार्दन दळवी (वय ४०, रा. कणकवली, मुळ रा. कळसुली) यांचा गोळी मारून खून केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दळवी यांचा मृतदेह शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीजवळ मोहन मळा येथे २० ते २५ फूट फरफटत नेलेल्या अवस्थेत आढळून आला. खुनाचे नेमके कारण काय? तो कोणी केला? याबाबत पोलिसांनी तपासाची जोरदार सूत्रे हलवली आहेत.
घटनास्थळी पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची टीम, फॉरेन्सिक लॅब पथक दाखल झाले आहेत. दळवी यांचा खून झाल्याची घटना समजताच नगराध्यक्ष संदेश पारकर, सुशांत नाईक, हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर, वागदे सरपंच संदीप सावंत, सोनू सावंत, बबलू सावंत यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
सुशांत दळवी कणकवली शहर तसेच परिसरात बांधकाम व्यवसाय करत होते. मुडेश्वर मैदान जवळ मोहन मळा येथे शेख यांच्या घरात काही भाडेकरू राहतात. त्यापैकी एका तरुणाला शुक्रवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह आढळून आला. त्यांनी शेख यांना कळवले. त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी रात्री असे काय घडले? की त्यामुळे सुशांत दळवी यांचा खून झाला? याचा तपास पोलिस करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
प्राथमिक तपासात सुशांत दळवी यांच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागून गंभीर जखम झाल्याचे दिसून येत आहे. त्यांना शिकारीचाही छंद होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. त्यामुळे पोलिस वेगवेगळ्या अंगाने तपास करत आहेत. मात्र, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.