कणकवली उपजिल्हा रुग्णालयात घडली घटना
कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील बांधकरवाडी येथील प्रकाश श्यामराव शिंदे (५०) हे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रिक्षाने आले होते. उपजिल्हा रुग्णालयात आल्यावर त्यांना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश शिंदे हे मद्यपान करून होते. त्यांनी ड्युटीवर असलेल्या डॉक्टर ला मला सलाईन लावायचे आहे असे सांगितले. परंतु सलाईन ची आवश्यकता नसल्याने डॉक्टरांनी सलाईन ची गरज नाहीय असे सांगितले. याचवेळी प्रकाश शिंदे यांनी गेट बाहेर लावलेली रिक्षात जाऊन धारदार तलवारीसारखा सुरा आणला. ही घटना रविवारी रात्री १:१५ वा. च्या सुमारास घडली. दरम्यान त्यांनी रुग्णालयात धुमाकूळ घालून तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास चोरमोले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रकाश शिंदे हे ऐकण्याच्या मनस्थितीत देखील नव्हते. त्याचवेळी त्यानी आपल्या मुलाला देखील मारण्याची धमकी दिली.
दरम्यान सुरक्षा रक्षक अमित परब आणि पांडुरंग सुतार, सुनील यादव यांनी धाव घेत त्यांना हल्ला करण्यापासून थांबवले. या घटनेची माहिती तात्काळ कणकवली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जात प्रकाश शिंदे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील, डॉ. विकास चोरमोले, कक्षसेवक सुनील यादव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
फोटो –
प्रकाश शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला करण्यासाठी आणलेला धारदार सुरा