कणकवली : कर्ज वसुलीसाठी गेलेल्या बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांवर कर्जदाराने लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न करत बँकेच्या वाहनाच्या काचा फोडल्याची घटना देवगड तालुक्यातील कळसूली येथे शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत रवी जगजीवन श्रीखंडे (वय ३४, रा. नागाळापार्क, करवीर, जि. कोल्हापूर) यांनी तक्रार दिली आहे. ते बँक ऑफ इंडिया अॅसेट रिकव्हरी ब्रँच, कोल्हापूर येथे प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झोनल मॅनेजर यांच्या आदेशानुसार श्रीखंडे हे शाखा प्रबंधक सिद्धार्थ वाघमारे, शिपाई अरुण मोरे व चालक अभिजीत पाटील यांच्यासह शनिवारी शिरगाव (ता. देवगड) परिसरात कर्ज वसुलीसाठी गेले होते. त्यानंतर सुजीत ट्रॅव्हल्स या खात्याचा कर्जदार सुजीत सुधाकर तावडे (रा. कळसूली, ता. कणकवली) याच्या घरी दुपारी सुमारे १ वाजता भेट दिली.
त्यावेळी तावडे हा हातात लोखंडी रॉड घेऊन बाहेर आला. बँक कर्मचाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी आल्याचे सांगितल्यावर त्याने संतापून त्यांच्यावर धावून येत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बँक कर्मचारी जीव वाचवून शासकीय वाहनात बसले. मात्र तावडे याने लोखंडी रॉडने वाहन क्रमांक MH-09-DX-7586 च्या पुढील व मागील काचांवर वार करून त्यांचे नुकसान केले. तसेच शिवीगाळ करत पुन्हा घरी आल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर बँक कर्मचाऱ्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात सुजित तावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे