1.7 C
New York
Tuesday, March 3, 2026

Buy now

काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात बहिणीचा अंत, भाऊ मृत्यूशी झुंजतोय

खारेपाटण नजीक होळीच्या दिवशी भीषण अपघात

कणकवली : सण उत्सवाचा आनंद, रंगांची उधळण आणि सर्वत्र ओसंडून वाहणारा उत्साह… पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. खारेपाटण परिसरातील जिजामातानगरमध्ये ज्या घरात सकाळी रंगांची उधळण होत होती, त्याच घरात दुपारी अश्रूंचा महापूर आला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे धुरी भाटलेवाडी बस थांब्याजवळ झालेल्या एका काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात अवघ्या १८ वर्षांच्या तनिषा शेट्येचा जागीच अंत झाला, तर तिचा सख्खा भाऊ ऋतुपर्ण हा सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. एका क्षणात शेट्ये कुटुंबाचा हसता-खेळता संसार उद्ध्वस्त झाला असून संपूर्ण खारेपाटण परिसर या घटनेने सुन्न झाला आहे.
मिळालेल्या हृदयद्रावक माहितीनुसार, एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असलेले पुरुषोत्तम शेट्ये यांची ही दोन्ही मुले. मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ऋतुपर्ण आपली कार (एमएच ०९ एबी ४३३९) घेऊन बहिणीसह तळेरेच्या दिशेने निघाला होता. गावात शिमगोत्सवाचे रंगात न्हालेले वातावरण असताना ही दोन्ही भावंडे हसत-खेळत घरातून बाहेर पडली. मात्र, नडगीवे नजीक उभ्या असलेल्या एका ट्रकला (एमएच ०८ एपी ४२४९) कारची मागून भीषण धडक बसली. हा आघात इतका भयानक होता की कारचा चक्काचूर झाला. नियतीने घात केला आणि फुलासारख्या उमलणाऱ्या तनिषाचे प्राण त्याच क्षणी विरले, तर तिचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला.
अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा तिथे जे दृश्य होते ते पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. कारमध्ये अडकलेल्या तनिषाच्या स्वप्नांना त्या एका धडकेने कायमचा पूर्णविराम दिला होता. जखमी ऋतुपर्णला स्थानिकांनी तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. संपूर्ण गाव आता ऋतुपर्णसाठी प्रार्थना करत आहे.
या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार, प्राची ईश्वरकर, गुरुप्रसाद शिंदे, महेंद्र गुरव, संकेत शेटे, महेश कोळसुलकर, भाऊ राणे, राजेंद्र चिके यांसह पोलीस प्रशासनातील मिलिंद देसाई, अवधूत गुणीजन, चंद्रकांत झोरे, विजय भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे आणि राजेश गायकवाड यांनी घटनेचा पंचनामा केला.
ज्या हातांनी सकाळी एकमेकांना रंगाची उधळण केली, त्याच हातांनी आता दुःखाचे ओझे सावरण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. सकाळी घरातून सुखरूप गेलेली भावंडे पुन्हा कधीच एकत्र दिसणार नाहीत, ही बोचरी जाणीव प्रत्येकाला रडवून जात आहे. तनिषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, एका निष्पाप मुलीच्या अकाली जाण्याने निसर्गही आज जणू हळहळत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!