महावितरणकडून प्राथमिक सर्व्हे पूर्ण.!
जि.प. सदस्य संदेश सावंत यांची आश्वासनपूर्ती.!
कणकवली | अनिकेत उचले : भिरवंडे गावातील विविध वाड्यांमध्ये स्ट्रीट लाईटची सुविधा अपुरी असल्याने नागरिकांना अंधारात ये-जा करावी लागत होती. वरची परतकामवाडी, वाचुकलेवाडी, हनुमंतवाडी, मुर्डवेवाडी, जांभूळ भाटलेवाडी तसेच वस्तीतील काही भागात अद्याप स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम प्रलंबित होते. याबाबत ग्रामस्थांनी माजी जि.प. अध्यक्ष तथा नवनिर्वाचित जि.प. सदस्य संदेश उर्फ गोटया सावंत यांच्याकडे मागणी केली होती.
ही मागणी गांभीर्याने घेत संदेश सावंत यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून संबंधित कामासाठी ४३ स्ट्रीट लाईट पोल मंजूर करून घेतले आहेत. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान, महावितरणच्या ठेकेदारामार्फत प्राथमिक सर्व्हे पूर्ण करण्यात आला असून संबंधित भागांची पाहणी करण्यात आली आहे. पोलची उपलब्धता होताच या कामाचा शुभारंभ करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर गावातील अंतर्गत रस्त्यांवर प्रकाशमान वातावरण निर्माण होणार असून नागरिकांची सुरक्षितता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना याचा दिलासा मिळणार आहे.
या विकासकामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून पालकमंत्री नितेश राणे आणि जि.प. सदस्य संदेश उर्फ गोटया सावंत यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
भिरवंडे गावाच्या विकासाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत स्थानिकांनी मांडत समाधान व्यक्त करण्यात आले.