प्रसंगी रेल रोकोही होण्याची शक्यता ?
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपोषणस्थळी दिली भेट
कणकवली : बोर्डवे येथे रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळावी या मागणीसाठी दशक्रोशी संघर्ष समितीच्यावतीने २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वा. पासून बोर्डवे रेल्वे फाटक येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास रेलरोको आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
शनिवारी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.
दरम्यान नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांच्या मागण्या मांडल्या. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आश्वासन देत प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे स्पष्ट केले. तसेच या कामासाठी अंदाजे ३० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. संबंधित विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संदेश पारकर म्हणाले की, बोर्डवे रेल्वे स्टेशन मंजुरीसाठी लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल. यासंदर्भात जिल्ह्यातील मंत्री, खासदार, तसेच राज्य सरकारच्या जबाबदार मंत्र्यांकडे व रेल्वे मंत्र्यांचीही भेट घेऊन पाठपुरावा करू असे आश्वासित केले.


