मालवण : मालवण येथील समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उसळलेल्या अजस्त्र लाटांच्या तडाख्यात पोलिसांची ‘नेपोलियन’ ही गस्ती नौका आज दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुडाल्याची घटना घडली. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस किनाऱ्यापासून सुमारे दहा वाव अंतरावर ही दुर्घटना घडली. सुदैवाने नौकेवरील सर्व पोलीस कर्मचारी व खलाशी सुखरूप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागील समुद्र परिसरात नेपोलियन ही पोलिसांची गस्ती नौका नियमित गस्त घालत होती. दरम्यान, समुद्रात अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाल्याने प्रचंड उंच लाटा निर्माण झाल्या. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या अजस्त्र लाटांनी नौकेला जोरदार धडक दिल्याने नौकेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आणि नौका बुडू लागली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नौकेवरील पोलीस व खलाशी यांनी तत्काळ खबरदारीची उपाययोजना करत समुद्रात उडी मारून आपला जीव वाचविला.
घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी योगेश तोडणकर यांच्या मालकीची नौका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या समवेत मत्स्यव्यावसायिक विली डिसोजा, नॉवेल फर्नांडिस, होमगार्ड जॉयल फर्नांडिस तसेच खलाशी रॉनी, कुमार, लॉरेन्स व बेंडिट यांनी बुडणारी नौका वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे नौका वाचविण्यात अपयश आले.
दरम्यान, बचावकार्यादरम्यान जलसमाधी मिळालेल्या नौकेवरील दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात पथकाला यश आले. मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या गस्ती नौकेला जलसमाधी मिळाल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची पुढील चौकशी सुरु आहे.