0.3 C
New York
Saturday, February 28, 2026

Buy now

नवीन विकास आराखड्यावर नागरिकांनी सूचना – हरकती नोंदवाव्यात – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली : कणकवली शहराचा नवीन विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये विविध आरक्षणांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही आरक्षणे रद्द झाली असून काहींमध्ये फेरबदल करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी नवीन आरक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्याचा सखोल अभ्यास सुरू असून नागरिकांनीही तो काळजीपूर्वक पाहून आवश्यकतेनुसार सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

कणकवली नगरपंचायत येथे नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. पारकर म्हणाले की, कणकवली शहराचा पहिला विकास आराखडा सन १९९९ पूर्वी तयार करण्यात आला होता. त्या आराखड्याची मुदत संपल्यानंतर आता नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. जुन्या आराखड्यावर अनेक जमीनमालकांनी हरकती नोंदवल्या होत्या; मात्र आता त्या हरकती ग्राह्य राहणार नाहीत. नव्याने प्रसिद्ध झालेल्या आराखड्यावरच आवश्यक असल्यास हरकती व सूचना नोंदवायच्या आहेत.

काही ठिकाणी चुकीचे आरक्षण असल्यास किंवा एखाद्या प्रभागात नवीन रस्त्यांची आवश्यकता असल्यास त्याबाबतची लेखी सूचना अथवा हरकत नगररचना विभाग सिंधुदुर्ग किंवा नगरपंचायत कार्यालयात सादर करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहराचा विकास आराखडा नुकताच प्रसिद्ध झाल्याने त्याचा अभ्यास सुरू आहे. शहरात अधिक सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने काही बाबी नवीन आराखड्यात समाविष्ट नसल्यास त्यासंदर्भात ठराव करून तो नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येईल. तसेच आरक्षणांमध्ये आवश्यक बदल, नवीन आरक्षणांचा समावेश आदींबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाने विकास आराखडा पाहून आवश्यक त्या सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार – पारकर

कणकवली शहराचा विकास आराखडा हा शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा, रस्ते, सार्वजनिक जागा आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून शक्य तेवढे प्रयत्न केले जातील, असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!