1.9 C
New York
Friday, February 20, 2026

Buy now

ढोल-ताशांच्या गजरात महापुरुष मंदिराची भव्य मिरवणूक; भक्ती आणि एकोप्याचा संगम…!

कणकवली – कणकवली शहरात शुक्रवारी सायंकाळी ढोल-ताशांचा दणदणाट, टाळ-मृदुंगाचा नाद, पारंपरिक वेशभूषेत महिलांचे लेझिम नृत्य आणि “श्री देव गणपती, श्री देव महापुरुष, साईबाबा की जय”च्या जयघोषात निघालेली भव्य सवाद्य मिरवणूक लक्षवेधी ठरली. श्री देव महापुरुष मंदिर च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या मिरवणुकीत भक्ती, परंपरा आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडले.
मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त २० ते २२ दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा होत आहे. शंकर व नाथदेवतांच्या प्रतिकृतींनी सजविलेल्या आकर्षक रथातून देवमूर्तींची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीचा शुभारंभ प. पू. भालचंद्र महाराज संस्थान येथे झाला. त्यानंतर पटकीदेवी व ढालकाठी मार्गे मिरवणूक रात्री महापुरुष मंदिरात दाखल झाली. सिंधुगर्जना ढोल पथकाने ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भारावून टाकले. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी सादर केलेले लेझिम नृत्य विशेष आकर्षण ठरले. टाळ-मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी ठेका धरत वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविले. शहरभर भक्तीचा सुगंध दरवळत असून प्रत्येकाच्या मनात अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाल्याचे चित्र दिसत होते.
या मिरवणुकीत नगराध्यक्ष संदेश पारकर, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, उपाध्यक्ष राजू पारकर, सचिव महेंद्र सांबरेकर,खजिनदार मंदार सापळे, नगरसेविका सुमेधा अंधारी, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, यांच्यासह महिला वर्ग व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला कार्यकर्त्यांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला.

*आजचे कार्यक्रम…*
वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि. २१ रोजी सकाळी ६ वा. श्रींच्या मूर्तीची नित्यपूजा, ७ वा. अभिषेक, ८ वा. स्थलशुद्धी, स्थानविधी, अग्निस्थापना, वास्तुहोम आदी धार्मिक विधी होणार आहेत. सकाळी ८ ते १२ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वा. महाआरती व १ वा. तीर्थप्रसाद होईल. दुपारच्या सत्रात भजनाचा कार्यक्रम, सायं. ७.३० वा. आरती, रात्री ८ वा. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान निर्मित ‘पडीक’ हे बालनाट्य सादर होईल. रात्री ९ वा. महापुरुष मित्रमंडळातील महिलांचा ‘व्वा वुमनिया’ हा विशेष कलाविष्कार रंगणार आहे.

फोटो –
शहरातून काढण्यात आलेली नवीन मूर्ती व कलशासह सवाद्य मिरवणूक (छाया – अनिकेत उचले)

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!