कणकवली | मयुर ठाकूर : भिरवंडे येथील रामेश्वर मंदिराच्या पर्यटन विकासासाठी प्रादेशिक पर्यटन निधीतून पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
भिरवंडे रामेश्वर मंदिराचे बांधकाम सध्या सुरू असून मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच पर्यटनाच्या दृष्टीने मंदिर परिसर अधिक आकर्षक बनवावा, या उद्देशाने देवालये संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, सचिव तुषार सावंत, संचालक संजय सावंत, संचालक अजित सावंत आदींनी ओम गणेश निवासस्थानी पालकमंत्र्यांची भेट घेतली.
यावेळी मंदिर विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रादेशिक पर्यटन योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. या निधीतून मंदिराचे कंपाऊंड वॉल बांधकाम, मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे, मंदिराच्या शेजारी तलावाचे बांधकाम करणे, सुशोभित गार्डन उभारणे, भक्तनिवासाचा विस्तार करणे, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधणे, मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे आणि भव्य प्रवेशद्वार उभारणे आदी कामे करण्यात येणार आहेत. तसेच मंदिर परिसरात अद्ययावत स्टेज उभारणे, भक्तांसाठी महाप्रसादासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करणे, वृक्षसंवर्धन करणे आणि दीपस्तंभ उभारणे यांचाही या विकास आराखड्यात समावेश आहे. गार्डनमध्ये लहान मुलांसाठी आधुनिक ट्रेन सुविधा निर्माण करून मंदिर परिसर पर्यटनदृष्ट्या अधिक आकर्षक करण्याचा मानस आहे. मंदिर विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून हा निधी तातडीने मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.