3.8 C
New York
Saturday, February 14, 2026

Buy now

कणकवली नगरपंचायत समिती वादात; जनतेचे प्रश्न मात्र जैसे थे

कणकवली : कणकवली नगरपंचायत प्रशासन सध्या विविध समित्या स्थापन करण्याच्या वादात अडकलेले असताना शहरातील मूलभूत प्रश्न मात्र जैसे थेच राहिल्याचे चित्र आहे. समित्यांच्या रचनेवरून सुरू असलेल्या राजकीय हालचाली, अंतर्गत मतभेद आणि अधिकारांच्या चर्चांमध्ये प्रशासन गुंतलेले असताना नागरिकांच्या दैनंदिन अडचणींकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने, विकासाच्या घोषणा आणि शब्दपूर्तीबाबतचे दावे यांची आठवण नागरिक करून देत आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता जबाबदार लोकप्रतिनिधी ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ या भूमिकेत पहायला मिळतात. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी परस्परांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, शहरातील भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, मुख्य रस्ते आणि बाजारपेठ परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने भटकी कुत्री पकड मोहीम, लसीकरण, तसेच जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई यांसारखे उपाय तातडीने राबवावेत, अशी मागणी होत आहे. समिती स्थापनेच्या राजकारणात वेळ न दवडता शहरातील ज्वलंत प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

आता समित्यांच्या वादाला पूर्णविराम देऊन विकासकामांना गती दिली जाणार का आणि दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याकडे कणकवली शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!