कणकवली : वरवडे परबवाडी येथील स्वयंभू श्री लिंगेश्वर मंदिर लिंगाची भाटी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हा उत्सव आयोजित करण्यात आला असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
उत्सवाच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२ या वेळेत अभिषेक होणार आहे. दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत महाआरती व तीर्थप्रसाद होणार आहे. दुपारी २ ते ३ या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच दुपारी ३ ते ६ या वेळेत विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत नदीपात्रात दिपार्पण सोहळा पार पडणार असून सायंकाळी ७ वाजता सुमधुर भजनांचा कार्यक्रम होणार आहे.
महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वानिमित्त संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून सर्व भक्तांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.