दिवसभर वीजपुरवठा खंडित, नागरिक व व्यापारी हैराण
कणकवली : कणकवली शहरात महावितरण विभागाच्या ढिसाळ आणि गजब कारभाराचा अनुभव सोमवारी नागरिकांना पुन्हा एकदा घ्यावा लागला. सोमवार असल्याने सकाळी नियोजित कामासाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र दिवसभर वीज नसल्याने किमान सायंकाळच्या वेळेत तरी वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. परंतु सायंकाळी सात वाजले तरीही वीजपुरवठा सुरू न झाल्याने शहरात नाराजीचे वातावरण पसरले.
दिवसभर वीज नसल्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. दुकाने, हॉटेल्स, लहान उद्योगधंदे तसेच सेवा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झाला. घरगुती ग्राहकांनाही उकाडा, पाण्याचा तुटवडा आणि दैनंदिन कामकाजात अडथळे यांचा सामना करावा लागला.
महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवण्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती किंवा वेळेपूर्वी सूचना न दिल्याने नागरिकांचा संताप वाढला.
वीजखंडित पुरवठ्यामुळे कणकवली शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, महावितरण विभागाने नियोजनबद्ध कामकाज करून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गाकडून होत आहे.