मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश होणार ?
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठा उलटफेर घडणार असून पालकमंत्री नितेश राणे आज उबाठा शिवसेनेला जोरदार धक्का देणार आहेत. नितेश राणेंच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढलेले, उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा आज भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश आज (१ फेब्रुवारी) रात्री ८ वाजता, कणकवली – हरकूळ बु. ग्रामपंचायत समोरील ‘कोकण रिट्रीट हॉल’ येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या झंझावातामुळे जिल्ह्यातील उबाठा शिवसेना पूर्णतः अस्त-व्यस्त झाल्याचे चित्र असून, उबाठाचे अनेक महत्त्वाचे एक्के गळाला लागले आहेत. आजच्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे उबाठाला राजकीयदृष्ट्या मोठा झटका बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, नितेश राणेंच्या विरोधात थेट विधानसभा निवडणूक लढलेले नेते भाजपमध्ये दाखल होत असल्याने नितेश राणेंचा राजकीय करिष्मा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या पक्षप्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठा उलटफेर निश्चित मानला जात आहे. या घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून, आतापर्यंत सुरू असलेल्या राजकीय चर्चाना आज रात्री निर्णायक विराम मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी उबाठा शिवसेना पक्षाचा राजीनामा दिलेले माजी जिल्हा बँक अध्यक्ष, माजी जि. प. अध्यक्ष सतीश सावंत हे आज रविवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा प्रवेशाचा कार्यक्रम हरकुळ बुद्रुक येथील कोकण रिट्रीट हॉल येथे रात्री ८ वाजता होणार आहे.
सतीश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण उबाठा शिवसेना पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले होते. जिल्ह्यात विकासाचे, विशेषतः सहकार वर्गातील अनेक प्रश्न असून त्याची सोडवणूक करण्यासाठी सत्ताधारी पक्षाची गरज असल्याचे सुतोवाच श्री. सावंत यांनी केले होते. त्याचवेळी सावंत हे भाजपच्या वाटेवर असल्याचे निश्चित झाले होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवलीत सभा होणार होती, त्याचवेळी सतीश सावंत भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही बोलले जात होते. दुर्दैवाने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ती सभा रद्द झाल्याने सतीश सावंत यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता.
दरम्यान, आता सतीश सावंत यांच्या सोबत उबाठा शिवसेनेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अर्थातच सतीश सावंत यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखीन वाढणार आहे.