-9.2 C
New York
Saturday, January 31, 2026

Buy now

वागदे घरफोडी चोरीप्रकरणी दुसऱ्या संशयिताला अटक

मुख्य संशयित फिर्यादीचा शेजारी

कणकवली : वागदे -।नमसवाडी येथे १७ जानेवारी रोजी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी श्रीकृष्ण ठाकूर (वय १९, रा. हळवल) याला अटक केली असून, त्याने चौकशीदरम्यान फिर्यादीच्या शेजारीच राहणाऱ्या गौरेश घाडीगांवकर (रा. वागदे) याचा सहभाग असल्याची माहिती दिल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वागदे येथील अंकिता घाडीगांवकर या १७ जानेवारी रोजी सकाळी कामावर गेल्या होत्या. घराची चावी खिडकीत आणि कपाटाची चावी घरातील पिशवीत ठेवलेली असताना, याच संधीचा फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटातील सुमारे ६२ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्यात आली. सायंकाळी घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकृष्ण ठाकूर याचे नाव पुढे आले.
२६ जानेवारी रोजी तो कणकवली रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच एलसीबी पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीतील दोन कुडी, एक डवली व एक अंगठी कणकवली येथील एका फायनान्स संस्थेत तारण ठेवल्याची कबुली दिली. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर श्रीकृष्ण ठाकूर याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीत त्याने या प्रकरणात गौरेश घाडिगावकर याचा सहभाग असल्याची माहिती दिली.
श्रीकृष्ण ठाकूर याने गौरेश घाडीगांवकर याच्याकडे वैयक्तिक अडचणींसाठी व्याजाने पैसे मागितले होते. त्यानंतर गौरेश याने तात्पुरत्या स्वरूपात आपल्या आईचे दागिने मदतीसाठी दिल्याचे सांगून, “गरजेसाठी वापर, नंतर परत दे,” असे सांगितल्याचा दावा आरोपीने केला आहे. ही दागिने देवाण-घेवाण वागदे येथील रेल्वे फाटक परिसरात झाल्याचेही श्रीकृष्ण ठाकूर याने सांगितले.
या माहितीच्या आधारे शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता एलसीबी व कणकवली पोलिसांच्या पथकाने वागदे येथे गौरेश घाडीगांवकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. समोरासमोर चौकशीदरम्यान गौरेश घाडीगांवकर हा समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे व तपासात सहकार्य करत नसल्याचे आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.

दरम्यान, चोरीला गेलेले सोन्याचे दागिने संबंधित फायनान्स संस्थेकडून जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांचा पंचनामा करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे दागिने फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे व किरण देसाई यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे व पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!