-7.6 C
New York
Friday, January 30, 2026

Buy now

अजित पवार हे महाराष्ट्रातील एक खंबीर नेतृत्व !

राज्याने एक कर्तृत्ववान, स्पष्टवक्ते आणि लोकाभिमुख नेता गमावला – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली : अजित पवार हे महाराष्ट्रातील एक खंबीर नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने कर्तबगार नेता गेला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रासह पवार कुटुंबीयांची मोठी हानी झाली आहे. त्यांच्याकडे मनाचा परखडपणा, कणखरपणा होता. मात्र, विखारीपणा नव्हाता. ६ वेळा उपमुख्यमंत्री पदासह अन्य खात्यांची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अजित पवार यांचे कणकवलीशी वेगळे नाते होते, अशा शब्दात व्यक्त होत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

कणकवली पटवर्धन चौकात कणकवली नगरपंचायत व आम्ही कणकवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाध्यक्ष बँक अध्यक्ष सतीश सावंत, आर. टी. मर्गज, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण, राष्टÑवादी (श.प.)चे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवली प्रवासी संघाचे तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे, अ‍ॅड. सुदीप कांबळे, प्रा. हरिभाऊ भिसे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, संकेत नाईक, लुकेश कांबळे, राष्ट्रवादी (श.प) सरचिटणीस रुपेश जाधव, सेवानिवृत्त प्रा. दिवाकर मुरकर, ठाकरे शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, माजी नगरसेवक विलास कोरगावकर, हरकुळ बुद्रुकचे सरपंच बंडू ठाकूर, संजय मालंडकर, वैभव मालंडकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, कन्हैया पारकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, हर्षद गावडे, प्रसाद अंधारी, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, साक्षी आमडोसकर, सुप्रिया पाटील, रिना जोगळे, शीतल सावंत विनायक उर्फ बाळू मेस्त्री आदी उपस्थित होते.

मनोहर पालयेकर म्हणाले, अजित पवार यांच्या कर्तृत्व, वक्तृत्व आणि दातृत्वाचा उल्लेख करत लाडकी बहीण योजनेबाबत वावठळ उठल्यानंतर “आम्ही अजून आहोत तोपर्यंत योजना चालू राहील,” असे ठणकावून सांगणारे अजित पवार हे ठाम आणि जबाबदार नेतृत्व होते, असे नमूद केले. घटनेची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त झाली, असे ते म्हणाले.

युवराज महालिंगे म्हणके की, अजित पवार यांचे व्यक्तिमत्त्व वर्णन करताना, संपूर्ण समाजालाच कुटुंब मानणारे, शत्रूनेही नाव घ्यावे असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने राजकारणात आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

विलास कोरगावकर म्हणाले, कणकवलीला मिळालेल्या भरघोस निधीतूनच विकासाची खरी सुरुवात झाली. शिस्त पाळणारे आणि शिस्त लावणारे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच नेतृत्व होते.

माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, दहा वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. दोन-तीन मिनिटांत समस्या समजून घेऊन उत्तर देणारे ते नेते होते. सरपंच पदापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत घडलेले हे नेतृत्व राज्याने गमावले आहे. त्यांच्या प्रत्येक गुणातून काहीतरी घेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.

सतीश सावंत म्हणाले, अजित पवार यांची आर्थिक शिस्त आणि प्रशासनावरील पकड जबरदस्त होती.ते आर्थिक शिस्तीचे जिवंत उदाहरण होते. वेळप्रसंगी कठोर, पण नेहमी लोकांच्या भल्याचा विचार करणारे नेते होते.

कणकवलीकरांच्या वतीने अशोक करंबेळकर यांनी भावना व्यक्त केली. ते म्हणाले, कालचा दिवस महाराष्ट्रासाठी सुन्न करणारा होता. दादा आजवर कधीच वेळ चुकवली नव्हती, पण आज वेळ चुकवली. दिवसाचे २४ तास कामात व्यस्त राहणारे, भारनियमन संपवणारे, योग्य असेल तरच होय किंवा नाही म्हणणारे धाडसी राजकारणी राज्याने गमावला आहे.

ॲड. राजेंद्र रावराणे म्हणाले, १९९० पासून सुरू झालेली कारकीर्द, सलग सात वेळा विक्रमी मतांनी निवड, सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी — हे त्यांचे नेतृत्व किती प्रभावी होते हे दाखवते. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक त्यांच्या केंद्रस्थानी होते.

बंडू हर्णे म्हणाले, अजितदादा हे खऱ्या अर्थाने प्रशासनातील दादा माणूस होते. प्रशासकीय शिस्त म्हणजे काय, हे त्यांनी नेहमीच दाखवून दिले. दादांनी कधीही वेळ चुकवली नाही, मात्र नियतीने वेळ चुकवली. स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी प्रशासनावर आपला ठसा उमटवला होता. ऊर्जा खात्याच्या माध्यमातून त्यांनी मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर उभारले. कणकवलीवर त्यांचे विशेष प्रेम होते आणि ते त्यांच्या कामातून नेहमीच दिसून आले.

या श्रद्धांजली कार्यक्रमातून अजित पवार हे केवळ पदाने मोठे नव्हे, तर कामाने, निर्णयक्षमतेने आणि लोकांशी असलेल्या नात्याने मोठे नेते होते, अशी सामूहिक भावना व्यक्त झाली. महाराष्ट्राने एक दर्जेदार, निर्भीड आणि लोकाभिमुख राजकारणी गमावल्याची खंत सर्वत्र जाणवत होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!