कणकवली : शहरातील पटवर्धन चौक परिसरात अवैध गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत एका टपरीवर छापा टाकून गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित टपरी मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांनी ही कारवाई केली. छाप्यादरम्यान प्रतिबंधित गुटख्याचे पाकिटे जप्त करण्यात आली. सदर कारवाईमुळे पटवर्धन चौक परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. पुढील काळात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे, हवालदार सुनील वेंगुर्लेकर, महिला पोलीस हवालदार तांबे, हवालदार सुदेश तांबे, कॉन्स्टेबल कळंत्रे, सागर जाधव आदी उपस्थित होते.