महाविकास आघाडीचे फोंडाघाट जि. प. मतदार संघाचे उमेदवार अनंत पिळणकर यांची ग्वाही ग्वाही
कणकवली :
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघ गेली कित्येक वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक ज्वलंत प्रश्न या मतदारसंघांमध्ये आहेत. त्याच सोडविण्यासाठी मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यानुसार मला उमेदवारी मिळाली असून निवडून आल्यानंतर फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष तथा फोंडाघाट जि. प. मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी दिली.
फोंडाघाट येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पिळणकर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नयन गावडे, काँग्रेसचे संतोष टक्के, चैतन्य सावंत, उबाठा शिवसेना उपतालुकाप्रमुख संजना कोलते, विभागप्रमुख सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.
श्री. पिळणकर म्हणाले, महाविकास आघाडीतर्फे फोंडाघाट जि. प. मतदार संघातून मला उमेदवारी जाहीर झाली आहे, याबाबत मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उबाठा शिवसेना नेते सतीश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या अर्चना घारे अशा सर्वांचेच आभार मानतो. पक्षाने दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करेन.
पिळणकर पुढे म्हणाले, फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाला सातत्याने एकाच ठिकाणचे उमेदवार लाभले. त्यामुळे या मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास होऊ शकलेला नाही. यासाठी मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली. आमचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिलेल्या शब्दानुसार मला महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात विशेषतः पाण्याचा प्रश्न आहे. खासकरून फोंडाघाट गावातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. लोरे तलावातील पाणी काढून ते विहिरीत सोडून त्यानंतर टाकीमध्ये सोडले जात आहे. हेच पाणी फोंडाघाटचे ग्रामस्थ वापरत आहे. हा आरोप मी जबाबदारीने करत असून वाटल्यास शासकीय यंत्रणेने त्याची पडताळणी करावी. तर जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर फोंडाघाटवासीयांना शुद्ध पाणी देण्यास मी कटिबद्ध आहे.
या मतदारसंघात आरोग्याचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी येथील रुग्णांना कणकवली उपजिल्हा रुग्णालय, ओरोस जिल्हा रुग्णालय, गोवा बांबोळी रुग्णालय येथे जावे लागते. म्हणूनच फोंडाघाट येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही पिळणकर म्हणाले.
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात अद्यापही सुसज्ज क्रीडांगण, गार्डन यांचीही कमतरता आहे. मी निवडून येईल त्यावेळी या भागामध्ये सुसज्ज अशी स्पोर्ट अकॅडमी उभारण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. तसेच या मतदारसंघातील खड्डेमय रस्ते, हायवेची बिकट अवस्था यादेखील समस्या आहेत. आतापर्यंत ज्यांनी सत्ता राबवली त्यांनी बघून बघून रस्ते बनवले. जेथे विरोधी पक्षाची मंडळी कार्यरत आहेत, तेथे हेतू पुरस्कर विकासकामे केली गेली नाहीत, असा आरोपही पिळणकर यांनी केला. मात्र, मी मनात कोणताही द्वेष न ठेवता चांगले काम करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक दुर्गम भाग असून तेथे स्ट्रीट लाईट नाहीयेत, त्या स्ट्रीट लाईट बसविण्याचाही मी प्रयत्न करणार आहे. येथे अनेक बचत गट कार्यरत असून त्यांच्यासाठी सातत्याने कार्यशाळा घेण्यात येतील, असेही पिळणकर म्हणाले.
फोंडाघाट बाजारपेठेत रस्त्याचे काम सुरू असून पर्यायी मार्गाचा प्रश्न अद्याप सोडवला गेलेला नाही. घाट मार्गामध्ये सुरू असलेले कामही निकृष्ट दर्जाचे आहे. याबाबत ठेकेदार कोणालाही जुमानत नाही. देवगड – निपाणी रस्ता कामातही मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणूनच निवडून आल्यानंतर ही सर्व कामे चांगल्या दर्जाची कशी होतील, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही पिळणकर म्हणाले.
आम्ही विरोधी पक्षांमध्ये कार्यरत असलो तरी निवडून आल्यानंतर माझ्या तसेच महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांना भेटून या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी कसा येईल, येथील समस्या सोडविण्यासाठी काय करावे लागेल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अगदी सत्तेतील मंत्र्यांकडेही मी अनेक विकासकामांसाठी जाईन. कारण मी सत्ताधारी पक्षात नसलो तरी विकासासाठी निधी मागण्याचा मला अधिकार आहे. अर्थातच हे सत्ताधारी मंत्री देखील मला विकासासाठी मदत करतील असा आशावादही ही पिळणकर यांनी व्यक्त केला.
देवघर पाटबंधारे प्रकल्पासह जिल्ह्यातील विविध धरणग्रस्तांसाठी मी वर्षानुवर्षी लढा देतोय. नवीन कुर्ली वसाहत पुनर्वसनाला 35 वर्षे झाली 2011 साली मी शुद्ध पाण्यासाठी आंदोलन केले होते. संपूर्ण राज्यात सर्वात प्रथम नवीन कुर्ली वसाहत येथे मी शुद्धीकरण यंत्रणा बसवून घेतली. नवीन कुर्ली वसाहतीच्या विकासासाठी मी गेली पंधरा वर्षे लढा देतोय. आतापर्यंत साडेनऊ कोटी रुपये फंड मी नवीन कुर्ली वसाहतीच्या विकासकामासाठी आणला आहे. 32 वर्षे येथे स्मशानभूमी नव्हती, ती मी मंजूर करून आणली. अत्यंत सुस्थितीत असणारी अशी ही स्मशानभूमी आहे, असे पिळणकर यांनी सांगितले.
ही निवडणूक मी विकासाच्याच मुद्द्यावर लढवणार आहे. कारण ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच असणार आहे. म्हणूनच विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवारावर मी टीका करणार नाही, असेही पिळणकर म्हणाले.