मालवण : आम्ही नारायण राणे यांचे आदेश मानणारे आहोत, पण कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये . जर आमच्या विरोधात एबी फॉर्म दिले जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. प्रसंगी माझ्या देहाचे बलिदान देईन, पण कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी महायुतीमध्ये भाजपला सुटलेल्या जागां व्यतिरिक्त कोणालाही फॉर्म देऊ नका, अशा स्पष्ट सूचना होत्या. मात्र तरीही भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात छुप्या पद्धतीने एबी फॉर्म दिले गेले. हा प्रकार पक्षादेशाला तिलांजली देणारा असून ज्यांनी हे कृत्य केले त्या शिवसेना जिल्हाप्रमुखावर खासदार नारायण राणे कारवाई करणार का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केल्याने चिंदरकर यांनी महायुतीतील अंतर्गत वादाला वाचा फोडली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे जागावाटप आणि एबी फॉर्मवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मालवण येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी चिंदरकर हे बोलत होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेवक मंदार केणी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. चिंदरकर म्हणाले की, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मसुरे, आडवली-मालडी, चिंदर, कोळंब, देवबाग, सुकळवाड आणि वराड या जागांचे एबी फॉर्म माझ्याकडे सुपूर्द केले होते. युतीमध्ये भाजपला सुटलेल्या जागां व्यतिरिक्त कोणालाही फॉर्म देऊ नका, अशा स्पष्ट सूचना होत्या. मात्र तरीही भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात छुप्या पद्धतीने एबी फॉर्म दिले गेले. हा प्रकार पक्षादेशाला तिलांजली देणारा आहे
श्री चिंदरकर म्हणाले मालवण नगरपालिकेपासून आजवर मी शांत होतो. लोकसभेत आणि विधानसभेत विरोधकांना अंगावर घेण्याचे काम आम्ही केले. मालवणमध्ये ६ पैकी किमान ३ जिल्हा परिषद जागांची आमची मागणी होती, पण आम्हाला केवळ १ जागा देऊन आमची बोळवण केली जात आहे. भाजप मालवणमध्ये जिवंत ठेवायचा आहे की शिंदे सेनेला दान करायचा आहे? नारायण राणे सांगतात लढणारे कार्यकर्ते व्हा, आम्ही लढणारेच आहोत. जर आमच्या व्यथांची दखल घेतली जात नाही, तर भाजप कार्यकर्ते सहाही जागांवर निवडणूक लढवतील.
भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध एबी फॉर्म टाकणे हा अक्षम्य गुन्हा आहे. त्यामुळे युतीचे नेते म्हणून नारायण राणे यांनी दोषींवर कडक कारवाई करावी. मी राजीनामा देऊन पळ काढणार नाही, तर पक्षात राहूनच अन्यायाविरोधात लढणार आहे. मी आता फक्त २ टक्केच बोललो आहे, वेळ आल्यावर उरलेले ९८ टक्के बाहेर काढीन असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
भाजपच्या कार्यकर्त्याला गेल्या वर्षभरापासून ‘ना घर का ना घाट का’ अशी वागणूक मिळत आहे. ही परिस्थिती बदलली नाही, तर कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक होईल आणि त्याला सर्वस्वी वरिष्ठ जबाबदार असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.