सम्मेद किडरगार्टन प्री-स्कूलचा वार्षिक दिन उत्साहात साजरा
कणकवली : लहान वयातच मुलांना शिक्षणासोबत कला, सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा आणि खेळ यांची ओळख झाल्यास शिक्षणाची ओढ निर्माण होते. या मुलांमधून उद्याचा सुसंस्कृत नागरिक आणि चांगला कलाकार घडू शकतो. महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य लहान मुलांच्या मनात रुजवणे आवश्यक असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते आत्मसातही करू शकतात, असे प्रतिपादन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
कणकवली शहरातील चौंडेश्वरी सभागृहात सम्मेद किडरगार्टन प्री-स्कूलचा वार्षिक दिनाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी आयडियल स्कूलच्या प्रिन्सिपल अर्चना देसाई, विस्तार अधिकारी रुपाली कदम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनमती ब्रम्हदंडे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर पुढे म्हणाले की, चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देत संस्कार, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सम्मेद किडरगार्टन प्री-स्कूलचा वार्षिक दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. वार्षिक दिनानिमित्त शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य, वेशभूषा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने उपस्थित पालक वर्गानेही मुलांचे कौतुक केले.
सुरुवातीला लावलेले एक छोटे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. पुढील काळातही ही शाळा आदर्श, संस्कारक्षम विद्यार्थी घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धेच्या युगात आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि जिद्द असल्यास कोणतेही विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत, असे सांगत कणकवलीतील विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधींचे सोने करावे, अशी अपेक्षाही श्री. पारकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चैताली मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शाळेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.