कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही नाही. महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. महायुती जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी नाराजी दिसते; मात्र एका जागेसाठी अनेक इच्छुक असणे स्वाभाविक आहे. उबाठा पक्षासारखी परिस्थिती आमची नसून उमेदवार शोधण्याची गरज आम्हाला पडत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे ना. नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती जाहीर करण्यात आली असून, त्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी झाल्याच्या माध्यमांतील बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे सत्तेतील सर्व पदे उपलब्ध असून कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रत्येकी पाच स्वीकृत सदस्य घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे कोणालाही नाराज होण्याची गरज नाही, असे ना. नितेश राणे यांनी सांगितले.
तसेच रविवारी भाई सावंत यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत बोलताना ते ना. नितेश राणे म्हणाले, भाई सावंत हे कडवे व निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांना पुन्हा पक्षात ताकदीने उभे केले जाईल. त्यांच्या मतदारसंघात दोन जागा शिवसेना लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक गाव व मतदारसंघाची परिस्थिती वेगळी असते. खासदार नारायण राणे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. राष्ट्रवादी काँग्रेस च्या जागे बाबत चर्चा सुरू आहे. चर्चेनंतर त्यांना किती आणि कोणत्या मतदारसंघात जागा द्यायच्या याबाबत सध्या विचार सुरू असल्याचेही नाम. नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान ठाकरे गटाचा समाचारही त्यांनी घेतला, ते म्हणाले मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू व मराठीच असणार आहे. राणेंना संपवण्याच्या घोषणा करणारेच आज मातीमोल झाले आहेत. राणे संपले अस म्हणणारी ठाकरे सेना आणि नेते स्वतःचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बसवू शकलेले नाहीत. भाजपात पक्ष प्रवेश होण्यासाठी रांग फार मोठी असते. सुरुवातीला फायद्याचे प्रवेश करून घ्यायचे असतात, तर फायदा नसणारे प्रवेश विचार करून आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्याठिकाणी कोणताही त्रास होणार नाही, कार्यकर्ते डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेऊन घ्यायचे असतात, असेही ना. नितेश राणे म्हणाले.
तर संजय राऊत आणि त्यांच्या मालकाकडे काय शिल्लक नाही. त्यांना पाठीचा कणा नाही त्यांना नाक घासाव लागणार. आमची महायुती भक्कम आहे. त्यामुळे संजय राऊत आणि त्यांचा मालक उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांच्या बारशात जाऊन पेढे खायची सवय आहे, अशा शब्दात ना. नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.