रुग्णांना चांगली सेवा देता येत नसेल तर इथे थांबू नका, रुग्णसेवेतील कोणतीही मस्ती मी खपवून घेणार नाही
पालकमंत्र्यांनी भरला अधिष्ठात्यांना चांगलाच दम ; कारवाईचे स्पष्ट संकेत
ओरोस : सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना योग्य व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर पोटात ट्यूमर असलेल्या एका महिला रुग्णाला गरोदर असल्याचा चुकीचा अहवाल देत गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी शुक्रवारी सकाळी थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आकस्मिक भेट दिली.
या भेटीदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. डवंगे यांना चांगलाच दम दिला. रुग्णांना चांगली सेवा देता येत नसेल तर इथे थांबू नका. रुग्णसेवेतील कोणतीही मस्ती मी खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा देत संबंधितांवर कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गावर नियंत्रण नसल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. गंभीर रुग्णांसाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबींवर अधिष्ठाता डॉ. डवंगे यांचे कोणतेही प्रभावी नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे.
गुरुवारी रात्री सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक परिसरात सुमारे रात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांना एक महिला आढळून आली. तिच्या पोटात मोठा ट्यूमर असल्याची लक्षणे दिसत असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला गरोदर असल्याचे घोषित केले. प्रसूती गुंतागुंतीची असल्याचे कारण पुढे करत पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिकेतून तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले.
मात्र गोवा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या सखोल तपासणीत सदर महिला गरोदर नसून तिच्या पोटात ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्राथमिक तपासणीतच एवढी गंभीर चूक कशी झाली, आवश्यक वैद्यकीय तपासण्या का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या चुकीच्या निदानामुळे संबंधित महिलेला मानसिक ताण सहन करावा लागला असून तिच्या आरोग्याशी गंभीर खेळ झाल्याचा आरोप होत आहे. या अनागोंदी कारभाराची तात्काळ दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीवर कठोर भूमिका घेतली आहे.