कणकवली : सोनगेवाडी व मराठा मंडळ परिसरातील निवासी संकुले व घरांमधून सांडपाणी गडनदीला जोडणाऱ्या नाल्याद्वारे थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या दूषित पाण्यावर कलमठ ग्रामपंचायतीच्या नळयोजनेद्वारे गावाला पाणीपुरवठा होत असल्याने कलमठवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नाल्याद्वारे नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी तात्काळ थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
ही बाब कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर गुरुवारी सकाळी श्री. पारकर यांनी गडनदीला जोडणाऱ्या नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, सचिन नेरकर, ध्वजा उचले, सोनाली खैरे, मनोज धुमाळे, विभव कंदरीकर, ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, हेलन कांबळे, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, किरण हुन्नरे, विलास गुडेकर, पप्पू कोरगावकर, जितेंद्र कांबळे, सुजीत जाधव, वैभव मालंडकर, तेजस राणे, मुन्ना भंडारी, जितू कांबळे, राजू राठोड, अमोल कोरगावकर, पराग पवार, आशिष मेस्त्री आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नाल्याद्वारे सांडपाणी नदीपात्रात मिसळल्यामुळे पाणी दूषित होत असून त्याचा थेट परिणाम कलमठ गावातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना नगराध्यक्ष पारकर यांनी केली. शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून नळपाणी योजनांवर जलशुद्धीकरण प्रकल्प (वॉटर ट्रीटमेंट प्लांट) बसविण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच नाल्याद्वारे गडनदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी थांबविण्यासाठी नाल्यालगत ५० मीटर अंतरावर शोषखड्डे तयार करण्याचे काम तात्काळ हाती घ्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. नाल्यालगत वाढलेली झाडी-झुडपे कापून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.