कणकवली : तालुका विधी सेवा समिती, कणकवली व वकील संघटना, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय, कणकवली येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी “Protect Today, Secure Tomorrow – Environmental Legal Literacy & Community Protection Initiative” या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणविषयक कायदेशीर साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, पर्यावरण विषयक कायदे, नागरिकांची कर्तव्ये आणि कायदेशीर उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. वकील प्रतिमा सातवसे व दीपिका राठोड यांनी उपस्थितांना सोप्या भाषेत पर्यावरण संरक्षणातील कायद्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश व तालुका विधी सेवा समिती, कणकवली यांचे अध्यक्ष शुभम लटूरिया यांनी भूषविले. ज्येष्ठ वकील बी. एम. दळवी, सहायक सरकारी अभियोक्ता श्री. उल्हाळकर, सहायक अधिक्षक मनीषा परब व वरिष्ठ लिपिक आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ लिपिक तेंडोलकर यांनी केले. सुमारे ३५ – ४० पक्षकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमानंतर न्यायालयीन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे स्वच्छता मोहीम राबवली. उपस्थितांनी असे मत व्यक्त केले की, या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी कायदेशीर साक्षरता वाढेल आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल.