धारदार शस्त्राने वार करून एक जण गंभीर जखमी
कणकवली : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी रात्री सुमारे ११ ते २ वाजण्याच्या दरम्यान शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत लोकेश विष्ट (वय ३३) याला एका अज्ञात व्यक्तीने डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत लोकेश विष्ट याच्या मित्राने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे यांच्यासह कणकवली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
जखमी लोकेश विष्ट याला प्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश विष्ट याच्यासोबत आणखी दोन मित्र होते. तिघेही नशेत असल्याचे बोलले जात आहे. रात्री ११ वाजल्यानंतर हे तिघे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात उभे असताना एक अज्ञात व्यक्ती तेथे आली. संबंधित व्यक्ती त्यांना ओळखीची नव्हती. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर हाणामारी होऊन अज्ञात व्यक्तीने लोकेश विष्ट याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला.
या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाच्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.