कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर निम्म्या रस्त्यावर वाहने पार्किंग
नगरपंचायत प्रशासनाच्या सुचनांकडे केले जातेय दुर्लक्ष
कणकवली :
कणकवली – नरडवे नाका ते कणकवली रेल्वे स्टेशनपर्यंतचा दुहेरी रस्ता सध्या प्रत्यक्षात एकेरीसारखा वापरात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मार्गावर ठिकठिकाणी वाहने पार्क करून ठेवली जात असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः या रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे मागाहून येणाऱ्या वाहनाला बाजू देता येत नाही परिणामी काही प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णवाहिका, शालेय वाहने व रेल्वे प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे.
या मार्गावरील काही गॅरेज व्यावसायिकांकडून दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या थेट रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. सदर रस्ता खासगी मालकीचा असल्यासारखा वापर केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना अनेक वेळा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर एकदा कारवाईदेखील करण्यात आली होती. मात्र या सूचनांचे व कारवाईचे कोणतेही पालन करण्यात आलेले नसल्याचे सध्या स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या गंभीर प्रश्नाकडे नगरपंचायत प्रशासन कोणती ठोस भूमिका घेणार, बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाई होणार का, याकडे कणकवलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. वाहतुकीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.