कणकवली : फोंडाघाट येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील राजन शंकर गमरे (५७, रा. सांताक्रूझ पूर्व – मुंबई) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात सापळा असून अटक केली. एलसीबीच्या पथकाने चलाखीने, विविध मार्गांचा वापर करत संशयित राजन याला कणकवलीत बोलावून घेत मुसक्या आवळल्या. ही कारवाई सोमवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली विशेष म्हणजे राजन हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर राज्यभरात ठिकठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर घटनेमध्ये सहा संशयीतांचा सहभाग निष्पन्न झाला होता. विशेष म्हणजे एलसीबीच्या पथकाने कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सहाही संशयतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एलसीबीची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. या कारवाईत एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासमवेत हवालदार राजू जामसंडेकर, आशिष गंगावणे, किरण देसाई आदी सहभागी झाले होते.
ही घटना फोंडा गाडी येथे 30 नोव्हेंबरला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या तर तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते. याच दरम्याने काही इसम जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे आपल्या हातातील साहित्य तिथेच पसार झाले होते. याबाबत तृप्ती यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.