कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिर समोरील हायवेनजीकच्या वहाळाजवळील संरक्षण कठड्यावर आयशर टेम्पो आदळून अपघात झाला आहे. या अपघातात चालक टेम्पो मध्ये अडकल्याने चालक किरकोळ जखमी झाला.
सदर अपघात शुक्रवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पो संरक्षण कठड्याला आदळल्याने दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. आयशर टेम्पो चालक आत मध्ये अडकला होता. त्याला स्थानिक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये, पांडुरंग मोरये, गुरुनाथ मोरये , संभाजी पाटील, अनिकेत बिडये, गुरु साळुंखे यांच्या मदतीने तसेच सदर मार्गावरून प्रवास करणारे एस. टी. चालक व वाहक यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले व नरेंद्र महाराजांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक पांडू तेली यांनी उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलविले आहे त्या ठिकाणी जखमी चालकावर उपचार सुरी होते.
सदरील मार्गावरील वाहतूक काही काळ एकेरी पद्धतीने सुरू होती.
या अपघाताची खबर नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी बिट अंमलदार चंद्रकांत झोरे यांना कळवताच अपघातस्थळी बिट अंमलदार चंद्रकांत झोरे, श्री. जगताप, श्री. घाडी दाखल झाले. या बाबत उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.


