-3.4 C
New York
Saturday, December 27, 2025

Buy now

कणकवलीत सेवानिवृत्त शिक्षकाची एक लाखाची रोकड लंपास

कणकवली : कणकवली बाजारपेठेत भरदिवसा हातचलाखी करून एका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाच्या पिशवीतील एक लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना मंगळवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० ते १२ वाजेच्या सुमारास सैनिक पतसंस्थेच्या शहर शाखेजवळ घडली. याप्रकरणी शशिकांत शंकर साटम (रा. कणकवली, शिवाजीनगर) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत साटम हे मंगळवारी सकाळी बाजारपेठेतील सैनिक पतसंस्थेतून पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी आपल्या खात्यातून एक लाख रुपयांची रक्कम काढली. ५०० रुपयांच्या नोटांची दोन बंडले (प्रत्येकी ५० हजार) त्यांनी आपल्याकडील शबनम पिशवीत सुरक्षित ठेवली होती. काही वेळानंतर आपल्या पिशवीची चेन लागत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पिशवीची चेन व्यवस्थित करण्यासाठी त्यांनी आठवडा बाजारातील एका दुकानातून दोन ‘हातपिन’ खरेदी केले. त्यानंतर नोटांची बंडले व्यवस्थित ठेवण्यासाठी पिशवी न मिळाल्याने त्यांनी बाजूच्या एका दुकानातून टॉवेल खरेदी केला. टॉवेलचे पैसे देण्यासाठी त्यांनी खिसा तपासला, मात्र त्याच वेळी त्यांना खांद्याला अडकवलेली शबनम पिशवी वजनाला अत्यंत हलकी लागली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पिशवी उघडून पाहिली असता, आतील ५०-५० हजारांची दोन बंडले गायब असल्याचे दिसून आले.
या प्रकारामुळे साटम हे हादरून गेले. त्यांनी तातडीने जवळच्या एका बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु चोरट्यांचा कोणताही सुगावा लागू शकला नाही. अखेर त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, बाजारपेठेतील अन्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!